बीड- कापूस व सोयाबीनच्या पेरणी क्षेत्रात गतवर्षीच्या तुलनेत २० टक्केहून अधिक वाढ होईल, असा अंदाज जिल्हा कृषी अधिकारी राजेंद्र निकम यांनी व्यक्त केला आहे. याशिवाय संपूर्ण मराठवाड्यात ऊसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात घटत आहे. सुरुवातीच्या काळात पाणी नसल्यामुळे उसाचे क्षेत्र कमी होईल, समाधानकारक पाऊस झाल्यावर ऑक्टोंबर नंतर ऊस लागवडीच्या हालचाली शेतकरी करू शकतात, असा अंदाज असल्याची माहिती अॅग्रो इनपुट डीलर्स असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष व इफकोचे(Indian Farmers Fertiliser Cooperative) संचालक मनमोहन कलंत्री यांनी 'ईटीव्ही भारत शी बोलताना सांगितले.
बीड जिल्ह्यात एकूण साडेदहा लाख हेक्टर क्षेत्र पेरणी योग्य आहे. यापैकी ७ लाख हेक्टर वर खरिपाची पेरणी होत असते. समाधानकारक पाऊस झाला तर, पेरणी क्षेत्र कधी-कधी वाढते देखील. यंदा उसाचे क्षेत्र पाण्याअभावी मोठ्या प्रमाणात घटले आहे. गतवर्षी बीड जिल्ह्यात उसाचे १ लाख हेक्टरहून अधिक क्षेत्र होते. यंदा पाण्याअभावी ऊस लागवड क्षेत्राची जागा सोयाबीन व कापूस यांनी घेतले आहे.
यंदा कापूस व सोयाबीन लागवड क्षेत्र २० टक्के वाढण्याची शक्यता गतवर्षीपेक्षा यावर्षी २० टक्के कापूस व सोयाबीनच्या पिकांमध्ये वाढ होत आहे. यामध्ये सोयाबीनची पेरणी दीड लाख हेक्टर वर जाण्याची शक्यता कृषी तज्ञांनी व्यक्त केली आहे. त्या पद्धतीने शेतकरी बी-बियाणे व खत खरेदी करण्यासाठी कृषी सेवा केंद्रावर गर्दी करू लागले असल्याचे चित्र सोमवारी पाहायला मिळाले.
कापसाच्या बियाण्यांची होते विक्रमी विक्री -दरवर्षी ९ लाख कापसाच्या बीयाचे पॅकेट विकले जातात. यावर्षी हा आकडा ११ लाख पॅकेट वर गेला असल्याचे बीड जिल्ह्यातील कृषी सेवा केंद्र चालक सांगतात.
कापूस व सोयाबीनचे क्षेत्र वाढण्याचे हे आहे मुख्य कारण -
जिल्ह्यात सातत्याने दुष्काळी परिस्थिती असून शेतकरी पावसावरच पेरणी करतात. अनेकवेळा पाऊस उशिरा होतो, अशा परिस्थितीत कापूस व सोयाबीन यांची लागवड व पेरणी ३० जुलैपर्यंत करता येऊ शकते. पेरणीला पावसाअभावी उशीर झाल्यानंतर शेतकऱ्यांना कापूस व सोयाबीन पेरणी करावी लागते. यामुळे दरवर्षी जिल्ह्यात कापूस व सोयाबीनचे क्षेत्र वाढण्यास हे देखील एक कारण असल्याचे जिल्हा कृषि अधिकारी राजेंद्र निकम यांनी सांगितले.
जिल्ह्यातील पीकनिहाय असे आहे खरीप पेरणी क्षेत्र -
कापूस - ४ लाख ५० हजार हेक्टर, सोयाबिन - १ लाख दहा हजार हेक्टर, बाजरी - ९० हजार हेक्टर, तूर - ६५ हजार हेक्टर, मूग - १० हजार हेक्टर, उडीद - ५ हजार हेक्टर