बीड :राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांचा महाराष्ट्र दौरा 17 ऑगस्टपासून सुरू होत आहे. राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या बीडमध्ये पवारांची सभा होणार असल्याने बॅनरबाजी पाहायला मिळत आहे. त्यामुळे शहरात लावण्यात आलेल्या बॅनरवरून शरद पवार गटाचे युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार गटावर जोरदार टीका केली आहे. अजित पवार गटाचे कार्यकर्ते स्वाभिमानी असतील तर त्यांनी पवारांचे फोटो वापरु नये, असे शेख यांनी म्हटले आहे. शरद पवार यांना भारतीय जनता पक्षाच्या विरोधात लढाई लढायची आहे, त्यासाठी त्यांनी मराठवाड्याची निवड केली. त्यांतच त्यांनी मराठवाड्यातील बीड जिल्ह्याला प्राधान्य दिल्याने कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
स्वाभिमानी असाल तर फोटो वापरू नका : अजित पवार गटाने बॅनरवर माझे फोटो वापरू नये असे सांगितले होते, तरीदेखील शरद पवारांचे फोटो अजित पवार गटाचे कार्यकर्ते वापरत आहेत. जर अजित पवार गटाचे कार्यकर्ते स्वाभिमानी असतील तर त्यांनी पवारांचे फोटो वापरु नयेत. कृषीमंत्री धनंजय मुंडे एका कार्यक्रमामध्ये म्हणाले की, शरद पवार आमच्यासाठी देव आहेत. जर शरद पवार देव असतील, तर त्यांना सोडून का गेलात, असा सवाल शेख यांनी विचारला आहे. भक्त कधीही देवाला सोडून जात नाहीत. बीड जिल्हा शरद पवारांच्या मागे आहे. आगामी निवडणुकांत राज्यात राष्ट्रवादीची सत्ता येईल, असा दावा देखील शेख यांनी केला आहे.