बीड - बीड जिल्ह्यातील पाणी पातळी १२ मीटरहून अधिक खोल गेली आहे. जिल्ह्यासह मराठवाडा भीषण दुष्काळाचा सामना करत आहे. हंडाभर पाण्यासाठी मैलोनमैल पायपीट करावी लागत आहे. एवढेच नाही तर पाटोदा तालुक्यातील उंबर विहिरा या गावातील अर्धे लोक गावाकडच्या दुष्काळाला वैतागून मुंबई-पुणे येथए स्थलांतरित होत आहेत. बीड जिल्ह्यात १४४ लघु व मध्यम सिंचन प्रकल्प आहेत. यातील ५० टक्के लघु प्रकल्प कोरडे पडले आहेत.
जिल्ह्यातील एकूण १४०४ गावांपैकी ६०६ गावे व ३२० वाड्यांवर भीषण दुष्काळाचे सावट आहे. प्रशासन टँकरने पाणीपुरवठा करत आहे. टँकरचे पाणी दूषित असल्याने नागरिकांना अनेक आजारांना सामोरे जावे लागत आहे. सध्या बीड जिल्ह्यात ८५२ टँकर सुरू आहेत. तसे पाहता बीड जिल्ह्यासाठी पाणीटंचाई नवीन नाही मात्र यावर्षी दुष्काळाची भीषणता यापूर्वीच्या दुष्काळापेक्षा तीव्र असल्याच्या भावना सर्वसामान्य नागरिक व्यक्त करत आहेत. तसेच यापूर्वी जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न फारसा गंभीर नसायचा मात्र यंदा जनावरांना चारा मिळतोय न माणसांना पिण्यासाठी पाणी या दुहेरी कात्रीत सापडलेला बीड जिल्ह्यातील शेतकरी दुष्काळामुळे होरपळला जात आहे.