महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Feb 6, 2021, 9:40 PM IST

ETV Bharat / state

तुम्ही बास! म्हणाल, इतका निधी विकासासाठी आणेल- धनंजय मुंडे

अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर येथे परळी ते पानगाव या ३२ किमी मार्गे परळी - चांदापुर - अंबलटेक - घाटनांदूर - पिंप्री - फावडेवाडी या ३६.१०० किमी. लांबीच्या ८५ कोटी रुपयांच्या रस्ता कामाचे भूमिपूजन धनंजय मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलत होते.

धनंजय मुंडे
धनंजय मुंडे

बीड (घाटनांदूर) - कोरोनाच्या वैश्विक महामारीमुळे मागील एक वर्ष सगळ्यांच्याच आयुष्यात वाया गेले. आता हळू-हळू विकासकामांना आपण वेग देत आहोत. येणाऱ्या चार वर्षाच्या काळात या मतदारसंघाचा विकास करताना निधी बास!, असे म्हणायची वेळ या भागातील लोकांवर येईल, असे काम करून दाखवू, असे प्रतिपादन बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे.

अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर येथे परळी ते पानगाव या ३२ किमी मार्गे परळी - चांदापुर - अंबलटेक - घाटनांदूर - पिंप्री - फावडेवाडी या ३६.१०० किमी. लांबीच्या ८५ कोटी रुपयांच्या रस्ता कामाचे भूमिपूजन आज धनंजय मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले.

धनंजय मुंडे

इथल्या मातीसाठी निस्वार्थपणे काम करणे हेच उद्दिष्ट-

मागील २५ वर्षाच्या राजकीय प्रवासात आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यात मी संघर्ष सहन केला. २००२ च्या जिल्हा परिषद निवडणुकीपासून ते आजपर्यंत प्रत्येक वळणावर संघर्ष आणि षडयंत्र यांचा मला सामना करावा लागला. परंतु माझ्या मतदारसंघातील प्रत्येक कुटुंबाला मी त्यांच्यातील एक सदस्य वाटतो. हे प्रेम आणि हा विश्वास मी कमावला ते इथल्या जनतेच्या बळावरच! इथल्या मातीसाठी निस्वार्थपणे काम करणे हेच माझे उद्दिष्ट असून, रस्ते, नाल्या, वीज या मूलभूत सुविधा देणे हा विकास म्हणता येणार नाही. तो तर कर्तव्याचा भाग आहे. या भागातील लोकांच्या दरडोई उत्पन्नात वाढ व्हावी, इथला शेतकरी सधन व्हावा हे माझं या मतदारसंघासाठी पाहिलेलं स्वप्न आहे. व ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी वचनबद्ध आहे, असेही धनंजय मुंडे याप्रसंगी म्हणाले.

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा शिवकन्याताई सिरसाट, आमदार संजय दौंड, मुंबई बाजार समितीचे सभापती अशोक डक, बजरंगबप्पा सोनवणे, राजकिशोर मोदी, सचिन मुळूक, बन्सी अण्णा सिरसाट, शिवाजी सिरसाट, गोविंद देशमुख, आदी उपस्थित होते.

मुंगीचा कारखाना या वर्षी सुरू होणार-

या दोन वर्षात या भागात चांगला पाऊस झाला. परंतु ऊस उत्पादक शेतकऱ्याला आपला ऊस गाळप होईल की नाही ही चिंता वाटते. शेतकऱ्यांनी चिंता करू नये, पुढील वर्षी एप्रिल महिन्यापासून आपला मुंगी येथील शिवपार्वती साखर कारखाना सुरू होणार असुन, त्यामुळे भागातील ऊसाला न्याय मिळेल, असेही मुंडे म्हणाले.

रस्त्याचा दर्जा सांभाळा-

रस्त्याचे काम बारामती येथील डीपीजे कन्स्ट्रक्शन या कंपनीकडे आहे. या कंपनीने कामाचा दर्जा संभाळून जलद गतीने वेळेच्या आत काम पूर्ण करावे, यासाठी मुंडेंनी सूचना केल्या. हे रस्ते येणाऱ्या काळात केवळ दळणवळण नव्हे तर औद्योगिक वाहतुकीसाठी वापरले जावेत. या दृष्टीने आपण काम करत असल्याचेही धनंजय मुंडे म्हणाले.

हेही वाचा-टिकैत यांचा केंद्राला अल्टीमेटम; महात्मा गांधींच्या जयंतीपर्यंत आंदोलन सुरूच राहणार

ABOUT THE AUTHOR

...view details