मुंबई -कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात एका तरुणीने ओशिवरा पोलीस ठाण्यात बलात्काराची तक्रार दाखल केली आहे. तसेच आपण मुंडेंचे नातेवाईक असल्याचा दावाही त्या तरुणीने केला आहे. त्या तरुणीने 10 जानेवारीला तक्रार दिली होती तर 11 जानेवारीला मुंबई पोलिसांनी तरुणीचा अर्ज स्वीकारला. दरम्यान, धनंजय मुंडे यांनी समाज माध्यमावर पोस्ट करत याप्रकरणी स्पष्टीकरण दिले आहे.
ते म्हणाले, कालपासून समाज माध्यमांमधून माझ्याविषयी काही कागदपत्र प्रसारित होत असल्याचे तसेच मीडिया व सोशल मिडियाद्वारे माझ्यावर बलात्काराचे आरोप करण्यात येत आहेत. या प्रकरणी रेणू शर्मा नावाच्या एका महिलेने (या रेणु शर्मा या करुणा शर्मा यांच्या सख्या लहान बहीण आहेत) स्वतः त्यांच्या खात्यावरून ट्विट केले आहे. माझ्याविरुद्ध काही तक्रार दाखल केल्याचा उल्लेख त्या कागदपत्रांमध्ये दिसून येतो. हे सर्व आरोप खोटे असून माझी बदनामी करणारे आणि मला ब्लॅकमेल करणारे आहेत.
पुढे त्यांनी लिहीले आहे की, करूणा शर्मा नावाच्या एका महिलेसोबत मी 2003 पासून परस्पर सहमतीने संबंधांत होतो. ही बाब माझे कुटुंबीय, पत्नी व मित्र परिवार यांना अवगत होती. या परस्पर सहमतीच्या संबंधामधून आम्हाला एक मुलगा व एक मुलगी, अशी दोन मुले झाली. या दोन्ही मुलांना मी माझे नाव दिले आहे. शाळेच्या दाखल्यापासून ते सर्व कागदपत्रांमध्ये या मुलांना पालक म्हणून माझेच नाव आहे, ही मुले माझ्यासोबतच राहतात. माझे कुटुंबीय, पत्नी आणि माझी मुले यांनी देखील या मुलांना कुटुंबीय म्हणून सामावून घेतले असून स्वीकृती दिलेली आहे. करुणा शर्मा नावाची महिला माझ्या मुलांची माता असल्यामुळे त्यांची मी सर्वोतोपरी पालनपोषणाची जबाबदारी स्वीकारली आहे. मी त्यांना मुंबईत सदनिका घेण्यास मदत केली आहे. मी त्यांना विमा पॉलिसी व त्यांच्या भावाला व्यवसाय स्थापित करण्यास मदत केलेली आहे. या सर्व कृती मी सद्भावनेने केलेल्या आहेत.
मात्र, 2019 पासून करूणा शर्मा त्यांची बहीण रेणू शर्मा यांनी मला ब्लॅकमेल करुन पैशाची मागणी करण्यास सुरुवात केली. माझ्या जीवितीला गंभीर शारीरिक इजा करण्याच्या, धोका करण्याच्या धमक्याही देण्यात आल्या. या सर्व प्रक्रियेत त्यांचा भाऊ ब्रिजेश शर्मा देखील सहभागी होता. याबाबत दि. 12 नोव्हेंबर, 2020 रोजी मे 2019 पासून घडत असलेल्या या सर्व बाबींसंदर्भात पोलीसांकडे तक्रार सुद्धा देण्यात आलेली आहे.