बीड- विधानसभा निवडणुकीत ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांचा पराभव करत मोदी-शाहंना यशस्वी टक्कर दिलेले धनंजय मुंडे निकालाच्या दुसऱ्याच दिवशी कामाला लागले आहेत. आपला विजयोत्सव बाजूला ठेवत मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या मदतीला ते धावून आले आहेत. परतीच्या पावसाने मराठवाड्यात सर्वत्र थैमान घातले असून सोयाबीनसह बाजरी, तूर, मूग, कापूस आदी पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्याचे प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी आमदार धनंजय मुंडे यांनी केली आहे.
विजयोत्सव बाजूला ठेवत धनंजय मुंडे शेतकऱ्यांच्या मदतीला - नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी धनंजय मुंडे यांनी केली
प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी धनंजय मुंडे यांनी केली आहे.
ऐन दिवाळीत बीड जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्यात परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली असून नद्या-नाले ओसांडून वाहत आहेत. निकालाच्या दुसऱ्याच दिवशी धनंजय मुंडे यांनी परळी शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवत शहरवासीयांना दिवाळी भेट दिली होती. त्यानंतर लगेच त्यांनी शेतीच्या नुकसानीबाबत आपल्या संवेदना व्यक्त केल्या आहेत. अगोदर कोरड्या दुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्यांनी कसेबसे बाजरी, सोयाबीन आदी पिकवले होते. शेतात उभ्या असलेल्या या पिकांना परतीच्या पावसाने जागेवर कोंब फुटत असून अनेक ठिकाणी सोयाबीनचे वेल पाण्यावर तरंगत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. तर फुटलेला कापुस पाण्याने काळा पडला असून त्यावर अळ्या पडल्या आहेत.
प्रशासनाकडून नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश असले तरी अद्याप ते आदेश जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले नसल्याचे समजते. त्यामुळे प्रत्यक्ष पंचनामे सुरू झालेले नाहीत. नुकसानग्रस्त भागात ओला दुष्काळ जाहीर करत सर्व पिकांचे पंचनामे करावेत व संबंधित शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची नुकसानभरपाई तात्काळ देऊन ऐन दिवाळीच्या सणात अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना आधार द्यावा, अशी मागणी परळीचे नवनिर्वाचित आमदार धनंजय मुंडे यांनी केली आहे.