बीड- राज्यात दुष्काळी परिस्थिती असतानादेखील भाजप सरकारच्या काळात प्रचंड महागाई वाढली आहे. सुशिक्षित बेरोजगारांना नोकऱ्या देऊ न शकलेल्या भाजपला आज मत मागायचा अधिकार नाही, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. मागील ५ वर्षाच्या काळात आमच्या बहिणींनी बीड जिल्ह्यात साधा एक तरी सिंचन प्रकल्प आणला का? असा प्रश्न धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला.
बीड जिल्ह्यातील पाटोदा येथे आयोजित जाहीर सभेमध्ये विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री प्रकाश सोळंके, माजी आमदार अमरसिंह पंडित, माजी आमदार सय्यद सलीम, बीड लोकसभेचे उमेदवार बजरंग सोनवणे, आष्टी येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे बाळासाहेब आजबे, महेंद्र गर्जे, सतीश शिंदे , राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्ष चंपावती पानसंबळ, रामकृष्ण बांगर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयसिंग सोळंके, राष्ट्रवादी लीग सेलचे प्रदेशाध्यक्ष एन. एल. जाधव आदींची उपस्थिती होती.
बीड लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या प्रचारार्थ बीड जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये सभांचे नियोजन करण्यात आले आहे. शनिवारी सर्वात अगोदर गेवराई येथे राष्ट्रवादी काँग्रेसची जाहीर सभा होणार होती. मात्र, अचानक गेवराई येथील राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यक्रम रद्द करून पाटोदा येथे घेण्यात आला.