बीड- विधानसभेची निवडणूक ही भाजपच्या सत्ता, पैसा आणि भावनिकते विरुध्द माझी सामान्य माणसाच्या विकासाची लढाई आहे. मतदार संघातील प्रत्येक माणसाचे उत्पन्न दुप्पट होईल, असा विकास करण्याचे माझे स्वप्न आहे. 22 वर्षे प्रामाणिकपणे सेवा केली त्यात कधी कमी पडलो नाही. या सेवेची मताच्या आशीर्वादाच्या रुपाने परतफेड करा, असे आवाहन विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केले.
हेही वाचा -'घरफोड्या करणार्यांचा पक्ष आता बुडणार'
परळी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या प्रशिक्षण मेळाव्यात हालगे गार्डनमध्ये झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. चाणक्य संस्थेचे राम भोजने यांनी यावेळी मार्गदर्शन केले. तर ज्येष्ठ नेते दत्ताआबा पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
भरल्या ताटावरून मला उठवले-
2009 च्या निवडणुकीतच मी आमदार झालो असतो. मात्र, मला भरल्या ताटावरून उठवण्यात आले. 22 वर्षांपासून तुमची सेवा करतो आहे. कर्ज काढले, अनेक हालअपेष्टा सहन केल्या, जमिनी विकल्या. मात्र, कार्यकर्त्यांच्या निवडणुकीत आणि जनतेच्या सेवेत कधी कमी पडलो नाही. आताची ही माझी लढाई कोणत्या व्यक्ती विरुध्द नाही तर मतदारसंघाच्या विकासासाठी आहे, असे मुंडेंनी सांगितले.