बीड - जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा आणि जिल्हा प्रशासन आचारसंहितेच्या काळात सत्ताधारी पक्षाच्या दबावात काम करत आहेत. एवढेच नाही तर बीडचे पोलीस अधीक्षक सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते असल्यासारखे वागत असल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला. सोमवारी मिरवणूक आणि सभेला आम्हाला परवानगी दिली असताना, त्याच दिवशी भाजपच्या सभेला परवानगी प्रशासनाने दिलीच कशी?, असा प्रश्न धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला. याबाबत आपण निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचेही ते म्हणाले.
विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे
बीड लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याच्या प्रचाराला सोमवारपासून सुरुवात झाली. राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्षाचे लोकसभेचे उमेदवार बजरंग सोनवणे यांचा उमेदवारी अर्ज सोमवारी रॅलीनंतर दाखल करण्यात येणार आहे. दरम्यान, बीड जिल्हा पोलीस आणि जिल्हा प्रशासन यांच्या आचारसंहितेच्या वागण्यावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी कडाडून टीका केली. सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना धनंजय मुंडेंनी प्रीतम मुंढेवर टीका केली.
राष्ट्रवादी काँग्रेसने २१ मार्चला रॅली आणि सभेसाठी जिल्हा पोलीस प्रशासनाकडून परवानगी घेतली होती. सकाळी दहा ते पाच या वेळेत आम्ही रॅली आणि सभा घेऊ, असे जिल्हा पोलीस प्रशासनाला सांगितले होते. या प्रस्तावाला जिल्हा पोलीस प्रशासनाने अगोदर परवानगीदेखील दिली. मात्र, भाजपच्या कार्यकर्त्यांनी पोलीस प्रशासनावर दबाव आणून आमच्या वेळेतच रॅली आणि सभेची परवानगी घेतली. एकाच दिवशी एकाच वेळी व एकाच मार्गावर रॅली काढण्यासाठी दोन पक्षांना पोलिसांनी परवानगी दिलीच कशी, असा प्रश्न यावेळी धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला.
भाजपचे पदाधिकारी सत्तेचा गैरवापर करत आहेत. जिल्हा प्रशासन आणि पोलीस दल सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या दबावात येणार असेल, तर आम्ही लोकसभा निवडणूक लढवायची कशी? असा प्रश्न देखील धनंजय मुंडे यांनी यावेळी उपस्थित केला. हा प्रकार आम्ही चालू देणार नाही, याबाबत निवडणूक आयोगाकडे रीतसर तक्रार करत असल्याचेही धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केले. यावेळी माजी मंत्री प्रकाश सोळंके, माजी आमदार अमरसिंह पंडित, माजी आमदार सय्यद सलीम, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी, संदीप क्षीरसागर, दादासाहेब मुंडे यांची उपस्थिती होती.