बीड - अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या माफियांकडून 65 हजार रुपयांची लाच स्वीकारताना उपजिल्हाधिकारी श्रीकांत गायकवाड याला एसीबीच्या पथकाने गुरुवारी रात्री आठच्या दरम्यान रंगेहात पकडले. ही कारवाई जालना येथील एसीबीच्या पथकाने बीड जिल्ह्यातील माजलगाव येथे केली. या कारवाईत महसूल विभागातील वरिष्ठ अधिकारी गळाला लागल्यामुळे मोठी खळबळ उडाली असून अनेकांचे धाबे दणाणले आहेत.
चालकासह उपजिल्हाधिकाऱ्याला अटक -
मागील पंधरा दिवसांपासून बीड जिल्ह्यातील अवैध वाळू वाहतूक रोखण्यात आली होती. ही वाहतूक पुन्हा अवैधपणे सुरू करण्यासाठी उपजिल्हाधिकारी श्रीकांत गायकवाड यांनी वाळूमाफियाकडे पैशाची मागणी केली होती. याची माहिती जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाल्यानंतर गुरुवारी रात्री सापळा रचण्यात आला. एसीबीने रचलेल्या सापळ्यात उपजिल्हाधिकारी श्रीकांत गायकवाड अडकले. वाळूच्या गाड्या सुरू राहू देण्यासाठी संबंधित वाळू ट्रकच्या चालकाकडून 65 हजार रुपयाची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी गायकवाड यांना रंगेहात पकडले. या प्रकरणात श्रीकांत गायकवाड यांच्या चालकासह स्वतः गायकवाड यांनादेखील पोलिसांनी ताब्यात घेतले. गुरुवार रात्री उशिरापर्यंत गायकवाड यांची कसून चौकशी सुरू होती.