बीड - महामारीच्या प्रार्श्वभूमीवर गेल्या तीन महिन्यांपासून शाळा-महाविद्यालये बंद आहेत. आता इतर क्षेत्रातील परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत असतानाच राज्य शासनाने उच्च माध्यमिकसह नववी व दहावीचे वर्ग सुरू करण्यासाठी हिरवा कंदील दाखवला. मात्र स्थानिक स्तरांवर याची परिस्थिती वेगळी आहे.
उच्च माध्यमिकचे वर्ग सुरू करण्यासाठी शिक्षण विभागासमोर आव्हान शासनाच्या निर्देशानुसार पुन्हा शाळा सुरू करण्याचे मोठे आव्हान बीडच्या शिक्षण विभागासमोर आहे. शालेय व्यवस्थापन समितीकडून याबाबत अहवाल मागवण्यात आला. संबंधित ग्रामपंचायतीला विश्वासात घेऊन शाळा सुरू करणार असल्याचे प्राथमिक शिक्षण अधिकारी अजय बहिर यांनी सांगितले. मात्र ग्रामीण भागातल्या बहुतांश शाळांची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. त्यामुळे शासन सुरू करत असलेल्या वर्गांतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर येऊ शकतो.
उच्च माध्यमिक आणि नववी-दहावीचे वर्ग तात्काळ सुरू करण्याचे राज्य शासनाचे निर्देश आहेत. याबाबत शिक्षण विभाग कामाला लागला असून ग्रामीण भागातील शालेय व्यवस्थापन समितीकडून या परिस्थितीबाबत अहवाल मागवण्यात आलाय.
बीडमध्ये 2 हजार 428 प्राथमिक शाळा तर 63 माध्यमिक शाळा आहेत. यामध्ये नववी व दहावीचे वर्ग जुलैपासून सुरू करण्याचे शासनाने निर्देश दिले आहेत. यादृष्टीने शालेय व्यवस्थापन समितीचे जवळपास 60 टक्क्यांपर्यंत अहवाल शिक्षण विभागाला प्राप्त झाले आहेत. यानुसार हात धुण्यासाठी पाण्याची व्यवस्था तसेच सोशल डिस्टन्स व इतर नियमांचे पालन करण्याची जबाबदारी संबंधित ग्रामपंचायत व शालेय व्यवस्थापन समितीकडे सोपवण्यात येणार आहे. कोरोनाच्या परिस्थितीमुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. प्रशासनाला अगोदर पालकांना विश्वासात घ्यावे लागणार आहे.
पालकांच्या मानसिकतेचा विचार करावा
महाराष्ट्र सरकारने उच्च माध्यमिक शाळा सुरू करण्यासंदर्भात निर्देश दिले असले तरीही अद्याप पालक मुलांना शाळेत पाठवणार आहेत का, याचा देखील विचार शिक्षण विभागाला करावा लागणार आहे. येत्या जुलै महिन्यात शाळा सुरू होणार आहेत. त्यामध्ये सर्वात अगोदर नववी व दहावी वर्गाचा समावेश राहणार असल्याचे शिक्षणाधिकारी अजय बहिर यांनी सांगितले.