महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Feb 16, 2021, 12:23 AM IST

ETV Bharat / state

प्रजासत्ताक दिन हिंसा प्रकरण : बीडच्या शंतनू मुळूकच्या घराची दिल्ली पोलिसांकडून झडती

नव्या कृषी कायद्यांविरोधात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनादरम्यान प्रजासत्ताक दिनी दिल्लीत हिंसक प्रकार घडला होता. या हिंसक आंदोलनाशी संबंध असल्याच्या संशयावरून दिल्ली पोलिसांचे एक पथक सोमवारी बीडमध्ये आले होते. यावेळी त्यांनी संशयित शंतनू शिवलाल मुळूक याच्या घराची झडती घेतली.

Delhi Police raids on shantanu muluks house regarding republic day violence case
प्रजासत्ताक दिन हिंसा प्रकरण : बीडच्या शंतनू मुळूकच्या घराची दिल्ली पोलिसांकडून झडती

बीड - नवी दिल्ली येथे शेतकरी आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसक आंदोलनाशी संबंध असल्याच्या संशयावरून दिल्ली पोलिसांचे एक पथक सोमवारी बीडमध्ये आले होते. यावेळी त्यांनी या प्रकरणातील संशयित शंतनू शिवलाल मुळूक याच्या चाणक्यपुरीतील घराची नुकतीच झडती घेतली. तसेच त्याच्या नातेवाईकांची चौकशीही केली.

शंतनू मुळूकच्या घराची घेतली झडती -

नव्या कृषी कायद्यांविरोधात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनादरम्यान प्रजासत्ताक दिनी दिल्लीत हिंसक प्रकार घडला होता. या आंदोलनादरम्यान टूलकिटचे प्रकरण समोर आले असून यामध्ये शहरातील शंतनू शिवलाल मुळूक या तरुणावरही गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्याच्या चौकशीसाठी दिल्ली पोलिसांचे एक पथक नुकतेच बीडमध्ये येऊन गेले. यावेळी शंतनू मुळूकच्या घरी जाऊन झडती घेतली. तसेच शंतनूचे वडील शिवलाल मुळूक व आई हेमलता मुळूक यांची चौकशी करुन त्याची पार्श्वभूमी जाणून घेतली. तसेच शंतनूचा अलीकडे कोणाकोणाशी संपर्क आला याचीदेखील माहिती घेतली. त्यानंतर शंतनुच्या वडिलांना घेऊन औरंगाबादला गेले. तेथे बँकेत जाऊन त्याच्या बँक खात्याचा तपशीलही दिल्ली पोलिसांनी घेतला. दरम्यान, शंतनू हा पर्यावरणप्रेमी असल्याचे सांगत त्याने आंदोलनाला पाठिंबा दिला म्हणून गुन्हा नोंद करुन त्याची नाहक बदनामी केली जात आहे, असा आरोप शंतनूचे वडील शिवलाल मुळूक यांनी केला आहे.

शंतनू पर्यावरणप्रेमी असल्याची माहिती -

शंतनूने बीई मॅकेनिकचे शिक्षण घेतले आहे. तसेच त्याने अमेरिकेत एमएसची पदवीदेखील घेतली आहे. तो पर्यावरण संवर्धनासंदर्भात राष्ट्रीय पातळीवर काम करतो. त्याला शेतकर्‍यांविषयी तळमळ असून शेतकरी आंदोलनाला सोशल मीडियाच्या माध्यमातून तो पाठींबा देत होता, अशी माहिती शंतनूच्या आईने दिली. दरम्यान, आठ दिवसांपूर्वी एका लग्न सोहळ्यासाठी शंतनू बीडला आला होता. तेव्हाच त्याची आई–वडिलांशी भेट झाली. त्यानंतर त्याच्याशी संपर्क नसल्याचे दोघांनी सांगितले.

हेही वाचा - पेट्रोलची शंभरी; राज्यात सर्वात महाग पेट्रोल परभणीत, नागरिक संतप्त

ABOUT THE AUTHOR

...view details