बीड -राज्यात सध्या सर्वत्र कोरोना विषाणूची धास्ती निर्माण झालेली आहे. या बिकट परिस्थितीत आरोग्य यंत्रणेत महत्त्वाचा घटक असलेल्या परिचारिका (नर्स) मोठ्या धैर्याने रुग्णसेवा करत आहेत. रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांबरोबर परिचारिका देखील सरकारी रुग्णालयात आलेल्या प्रत्येक रुग्णांची काळजी घेत आहेत. कोरना विषाणूच्या पार्श्वभूमीवर ठरलेल्या वेळेपेक्षा अधिक काम परिचारिका करत आहेत. एका दृष्टीने आमच्यासाठी ही युद्धजन्य परिस्थिती असल्याचे सेविका संगिता दिंडकर यांनी सांगितले.
कोरोनाच्या प्रादुर्भावानंतरही परिचारिका आपली रुग्णसेवा प्रामाणिकपणे करत आहेत... त्यांच्या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे हेही वाचा...डॉ.डी वाय पाटील हॉस्पिटल परिसरात भीषण आग; जीवितहानी नाही
बीड जिल्हा रुग्णालयामध्ये कोरोनाच्या रुग्णांसाठी विशेष कक्ष स्थापन केला आहे. सुदैवाने बीड जिल्ह्यात अद्याप कोरोनाबाधित रुग्ण आढळलेला नाही. असे असले तरी सरकारी रुग्णालयातील सर्वसामान्य नागरिकांची गर्दी कमी झाली आहे. अनेकवेळा इतर उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णांचे नातेवाईक देखील जिल्हा रुग्णालयाकडे फिरकत नाहीत. अशा परिस्थितीत बीड जिल्हा रुग्णालयात काम करणाऱ्या परिचारिका ठरलेल्या वेळेपेक्षा अधिक काम करत असल्याचे चित्र बीड जिल्हा रुग्णालयात पाहायला मिळाले.
हेही वाचा...'कोरोना तपासणीसाठी रक्ताची चाचणी केली जात नाही', आरोग्य विभागाचा खुलासा
'आम्हाला आरोग्य विभागाकडून विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. अशा बिकट परिस्थितीत स्वतःची काळजी घेत रुग्णावर उपचार व रुग्णसेवा कशी करायची याचे आम्हाला प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यानुसार आम्ही काम करत आहोत. सध्या कोरोना विषाणूची भीती आहे. मात्र, आम्ही स्वतः सर्व काळजी घेत आहोत. ही परिस्थिती आमच्यासाठी युध्दजन्य परिस्थिती आहे' असे यावेळी बोलताना जिल्हा रुग्णालयातील परिचारिकांनी सांगितले आहे. आरोग्य यंत्रणेचा कणा असलेल्या राज्यभरातील परिचारिकांचे सर्वत्र कौतुक होत आहे.