बीड - बीड जिल्ह्यातील केज तालुक्यामधील विडा या गावात दरवर्षी धूलिवंदनाच्या दिवशी गाढवावर बसून जावयाची मिरवणूक काढण्याची ८० वर्षांची परंपरा यंदा जमावबंदी आदेशामुळे खंडित होणार आहे. शनिवारी बीडचे जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी जमावबंदी तसेच सार्वजनिक कार्यक्रमावर बंदी घातली आहे.
केस तालुक्यातील विडा हे पाच हजारांवर लोकसंख्येचे गाव आहे. निझामकालीन राजवटीत विडा जहागीरदारीचे गाव होते. तत्कालिन जहागिरदार आनंदराव देशमुख यांचे जावई साधारण ८५ वर्षांपूर्वी ऐन धुलीवंदनाच्या दिवशी गावात आले. त्यांची मिरवणूक निघाली होती. तेव्हापासून ही विड्याची परंपराच बनली आहे. दरवर्षी धूलिवंदनाला जावयाची गाढवावर बसवून, गळ्यात चपलांचा हार घालून वाजत-गाजत, रंगांची उधळण करत मिरवणूक काढली जाते.
15 दिवस अगोदर पासूनच सुरु असते नियोजन -
गदर्भ मिरवणुकीसाठी धूलिवंदनाच्या १५ दिवस आधीपासूनच तरुण मंडळींचे नियोजन सुरु असते. जावयावर 'ट्रॅप' लावून त्यांना पकडून आणून गाढवावर बसवून गावभर जल्लोषात मिरवणूक काढण्यात येते. त्यानंतर आहेर करुन त्यांचा पाहूणचारही केला जातो. गाढव मिरवणुकीचे संकट टाळण्यासाठी धूलिवंदनाचा सण आला की, विड्याचे जावई भूमिगत होतात. कधी मेहुणे मंडळी येतील अन् गाढवसवारीसाठी घेऊन जातील याचा नेम नसतो. त्यामुळे अनेक जावई लपून बसतात.
दरम्यान, गाव जावई, घरजावई आणि व्यवसाय - नोकरी निमित्त सासुरवाडीतच (विडा) स्थिरावलेले जावई अशी मिळून दोनशेंवर संख्या आहे. पण, येरव्ही गावगाड्यात महत्वाची भूमिका बजावणारी ही जावई मंडळी धुलीवंदन येताच पोबारा करतात. विशेष म्हणजे गावातील सासुरवाडी असलेल्या दिवंगत देवराव मस्कर, त्यांचे गावातीलच जावई महादेव पवार आणि महादेवरावांचे गावातीलच जावई अंगद देठे या तिघांनाही हा मान मिळालेला आहे.
एका जावयाची एकदाच मिरवणूक-
एकदा मिरवणूक निघालेल्यांची दुसऱ्यांदा मिरवणूक काढली जात नाही. गतवर्षी धूलिवंदनाच्या सणानंतर कोरोनाने जिल्ह्यात 'एंट्री' केली होती. यंदा धूलिवंदन सणाच्या तोंडावरच रुग्णसंख्या वाढू लागली आहे. त्यामुळे जमावबंदी आदेश लागू करण्यात आलेला असून मिरवणुका, यात्रोत्सव देखील रद्द करण्याचे आदेश जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी दिलेले आहेत. त्यामुळे विड्यातील धूलिवंदन दिनाची गदर्भसवारीची आठ दशकांची परंपरा यंदा खंडित होणार आहे. मिरवणूकच निघणार नसल्याने जावयांसाठी कोरोना पर्वणी ठरत असून त्यांच्यावरचे गाढवसवारीचे संकट टळणार आहे.