बीड (अंबाजोगाई) -बीड जिल्ह्यात कोवीड रुग्णांची सातत्याने वाढत जाणारी रुग्णसंख्या आणि अलिकडेच वाढलेल्या मृत्यूदराची दखल घेवून आज केंद्रीय आरोग पथकाने स्वारातीच्या डीसीसीएचच्या आयसीयु सेंटरला भेट देवून रुग्णांना देण्यात येणाऱ्या आरोग्य सुविधांची पाहणी केली. या पथकात लेडी हार्डिंग मेडिकल कॉलेज, नवी दिल्लीच्या डॉ. रक्षदा कुंडल व एआयआयएमएस, नागपूर येथील डॉ. अरविंद कुशवाह यांचा समावेश होता.
बीड जिल्ह्यातील सातत्याने वाढत जाणारी कोवीड रुग्णांची संख्या आणि अलिकडेच वाढलेल्या मृत्यू दर लक्षात घेवून यामागील कारणांचा शोध घेण्यासाठी केंद्रीय आरोग्य पथकातील डॉ. रक्षदा कुंडल आणि डॉ. अरविंद कुशवाह यांनी कोवीड सेंटरची पहाणी करुन उपलब्ध आरोग्य सेवा बद्दलची माहिती घेतली आहे. आज या टीमने स्वारातीच्या डीसीसीएच सेंटरच्या आयसीयु वॉर्डत जावून रुग्णांना देण्यात येणाऱ्या आरोग्य सेवेची पहाणी केली. यावेळी डॉ. रक्षदा कुंडल व डॉ. अरविंद कुशवाह या दोघांनी अनेक रुग्णांशी थेट संवाद साधत आपणास आरोग्य सेवा कशी मिळते याची विचारणा केली. डॉक्टर येतात का? तुमच्या अडचणी समजून घेतात का? तुमच्यावर योग्य उपचार होतो का? असे प्रश्न यावेळी त्यांनी विचारले.
डीसीसीएच च्या आयसीयु वॉर्डची पाहणी आटोपल्यानंतर केंद्रीय पथकाने कोविड रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांशी संवाद साधत उपचार पद्धती समजावून घेतली. अत्यवस्थ कोवीड रुग्णांसाठी आवश्यक असणाऱ्या आयसीयूमध्ये एसी बसवण्याची सुचना या पथकाने अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांना केली. या सोबतच इतर आवश्यक सूचना ही या पथकाने वैद्यकीय महाविद्यालयाच्या टीमला केल्या.