महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गर्दी टाळत रक्तदान शिबिराने साजरी करा गोपीनाथ मुंडे यांची जयंती; पंकजा मुंडेंचे आवाहन

भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंती निमित्त पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांना रक्तदान करण्याचे आवाहन केले आहे. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गोपीनाथ गडावर गर्दी न करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

pankaja munde
पंकजा मुंडे

By

Published : Dec 11, 2020, 12:51 PM IST

बीड- भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचा 12 डिसेंबर हा जन्मदिवस परळी येथील गोपीनाथ गडावर दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी महाराष्ट्रातील अनेक मंत्री व सामाजिक क्षेत्रात काम करणारे दिग्गज यांची या ठिकाणी उपस्थिती लावतात. मात्र यावर्षी संबंध देशावर कोरोनाचे संकट आहे. यामुळे गर्दी टाळत केवळ रक्तदान शिबीर घेऊन महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांनी गोपीनाथ मुंडे यांची जयंती साजरी करण्याचे आवाहन माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी केले आहे.

यंदा गोपीनाथ गडावर कार्यक्रम नाही-

याबाबत माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांना आवाहन करताना म्हटले आहे की, '12 डिसेंबर हा दिवस आपल्या सर्वांना अत्यंत प्रेरणा, ऊर्जा आणि जीवनामध्ये आशा देणारा दिवस आहे. मुंडे साहेब हयात असताना आपण सर्व हा दिवस वेगवेगळ्या पद्धतीने आणि उत्साहाने साजरा करत होतो. आज ते हयात नाहीत, परंतु आपल्यासाठी ते स्वाभिमानाची प्रेरणा देणारे संघर्षाचा महामेरू आहेत. 12 डिसेंबर हा जन्मदिवस आणि 3 जून या स्मृतीदिनी आतापर्यंत गोपीनाथ गडावर मोठ मोठे नेते, मंत्री, विविध क्षेत्रातील मान्यवर, छत्रपती उदयनराजे आणि संभाजीराजे आदींनी उपस्थित राहून संघर्षाच्या या जीवन प्रवासाला आदरांजली अर्पण केली. यंदा मात्र दरवर्षी सारखा मोठा कार्यक्रम होणार नाही.'

रक्तदान शिबिराने साजरी करा,पंकजा मुंडेंचे आवाहन गोपीनाथ मुंडे यांची जयंती
रक्तदान शिबिरे आयोजित करा-कोरोना महामारीच्या संकटात सामाजिक उपयोगिता आणि आवश्यकता लक्षात घेऊन गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त सर्वत्र रक्तदानाचे कार्यक्रम आयोजित करावेत आणि 12 डिसेंबर हा जन्मदिवस साजरा करावा, सर्वांनी 12 ते 15 डिसेंबर दरम्यान ठिकठिकाणी केवळ आणि केवळ रक्तदानाचे कार्यक्रम आयोजित करायचे आहेत. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान, असल्याने मुंडे साहेबांच्या जन्मदिवशी असे समर्पित कार्यक्रम घ्यावेत व त्याचे फोटो आणि कार्यक्रमाचे वर्णन सोशल मिडियावर द्यावेत, असे आवाहनही पंकजा मुंडे यांनी केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details