बीड - शहरातील विप्रनगर भागातील एका व्यापाऱ्याच्या घराची खिडकी तोडून चोरट्यांनी सव्वा दोन लाखांचा ऐवज लंपास केला आहे. मंगळवारी (दि.24 डिसें) पहाटे झालेल्या या चोरीमध्ये पाच तोळे दागिने, चांदीचे शिक्के आणि रोख 15 हजार रुपये पळवण्यात आले आहे.
जिल्ह्यातील घरफोड्यांच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. तसेच पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याने कायदा व व्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
चोरट्यांनी घरात घुसण्यासाठी फोडलेली खिडकी सर्व झोपल्यावर त्यांनी केला हात साफ
व्यापारी राजेंद्र हिरालाल दागडिया (वय-47) हे कुटुंबीयांसमवेत राहतात. त्यांच्या आई मंगळवारी सकाळी चारधाम यात्रेसाठी जाणार होत्या. यासाठी सोमवारी रात्रीच दागडिया कुटुंबीयांनी सर्व साहित्य बॅगमध्ये भरुन तयारी केली होती.
घरातील सर्व झोपी गेल्यानंतर मंगळवारी पहाटे चोरट्यांनी खिडकी फोडली. यानंतर ग्रील काढून घरात प्रवेश केला. या खोलीत कोणीही नसल्याने चोरांनी कपाटाशेजारीच ठेवलेल्या किल्ल्यांमार्फत कपाट उघडले; आणि हात साफ केला. यामध्ये एक लाख किंमतीचे लॉकेट, झुंबर, मणीमाळ, अंगठ्या असे पाचतोळे दागिने तसेच देवीची प्रतिकृती असलेले दोन हजार किंमतीचे चांदीचे 10 शिक्के आणि रोख 15 हजारांचा ऐवज चोरटयांनी लंपास केली.
सकाळी उठल्यानंतर कपाट उघडे दिसल्याने संबंधित प्रकार निदर्शनास आला. राजेंद्र दागडिया यांच्या फिर्यादीवरुन पेठ बीड ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
संशयितांची झाडाझडती
संबंधित प्रकार घडल्यानंतर श्वानपथक, ठसेतज्ज्ञ आणि आयबाईक कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. तसेच गुन्हे शाखा निरीक्षक भारत राऊत, पेठ बीड ठाण्याचे निरीक्षक विश्वास पाटील, दरोडा प्रतिबंधक पथकाचे साहाय्यक निरीक्षक गजानन जाधव, संदीप सावळे यांनीही घटनास्थळी धाव घेतली.