बीड- मागील अनेक वर्षापासून होणारा दसरा मेळावा भगवान भक्ती गड सावरगाव येथून ऑनलाइन होणार असल्याची माहिती मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली आहे. यावर्षी कोरोनाच्या संकटामुळे नागरिकांच्या आरोग्याशी खेळ नको, म्हणून दसरा मेळावा ऑनलाईन करण्यात येणार असल्याचे पंकजा मुंडे यांनी जाहीर केले आहे.
दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या पासून पूर्वी भगवान गडावर व मागील चार वर्षापासून भगवान बाबाचे जन्मस्थान असलेल्या सावरगाव येथील भगवान भक्ती गड येथे दसरा मेळावा होत होता. या मेळाव्यानंतरच ऊसतोड कामगार ऊस तोडणीला जातो. यंदा मात्र वरुणाच्या बिकट परिस्थितीमुळे हा दसरा मेळावा जाहीरपणे होणार नाही. मात्र ऑनलाइन दसरा मेळावा करण्यात येणार आहे.
यंदा भगवान-भक्ती गडावरून होणार ऑनलाईन दसरा मेळावा
दरवर्षी भगवान बाबाच्या जन्मस्थळावर पंकजा मुंडे दसरा मेळाव्याचे आयोजन करतात. यंदा मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन दसरा मेळावा घेण्याचा निर्णय पंकजा मुंडे यांनी घेतला आहे.
माजी मंत्री पंकजा मुंडे या ऑनलाइन भाषण करून राज्यभरातील ऊसतोड कामगारांशी संवाद साधणार आहेत. याबाबत पंकजा मुंडे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसाठी एक व्हिडिओ जारी केला असून त्यात त्या म्हणतात, 'यावेळी सर्वांनी भगवान भक्तीगडावर येण्याऐवजी आपापल्या गावात भगवान बाबांच्या प्रतिमेचे सार्वजनिक पूजन करावे. दरवर्षी संख्येचा विक्रम होतो. यावर्षी ऑनलाइन कार्यक्रमाच्या संख्येचा विक्रम आपण करूयात'. मी भगवान भक्तीगडावरून तुम्हाला याही वर्षी मार्गदर्शन करणार आहे. पण ते ऑनलाईन असणार आहे असे पंकजा यांनी स्पष्ट केले. त्यामुळे यंदाचा मेळाव्याला खंड पडणार नाही आणि आपली भक्ती आणि शक्तीची परंपरा देखील कायम राहील असे, त्या म्हणाल्या.