बीड - मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यामुळे व नीट परीक्षेमध्ये कमी गुण मिळाल्याने मेडिकलला नंबर लागणार नाही, अशा आशयाची चिठ्ठी केतुरा येथील तरुणाने लिहून आत्महत्या केल्याचे समोर आले होते. त्यामुळे राज्यात खळबळ माजली होती. मात्र ही व्हायरल झालेली चिठ्ठी बनावट असल्याचे हस्ताक्षर तज्ज्ञांनी दिलेल्या अहवालावरून स्पष्ट झाले आहे. याविषयी जिल्हा पोलीस अधीक्षक राजा रामास्वामी यांनी ती चिठ्ठी बनावट असल्याचा खुलासा केला आहे.
विवेकची आत्महत्या आरक्षणासाठी नाही; 'ती' चिठ्ठी बनावट असल्याचा पोलिसांकडून खुलासा - बीड व्हायरल सुसाईड नोट
बीड तालुक्यातील केतुरा येथील 18 वर्षीय विवेक रहाडे या विद्यार्थ्याने गुरुवारी आत्महत्या केली होती. ही आत्महत्या मराठा आरक्षणासाठी केली असल्याचे सांगण्यात येणारी चिठ्ठी व्हायरल झाली होती. त्यामुळे राज्यात एकच खळबळ माजली होती अनेकांनी रहाडेच्या कुटुंबीयांची भेट घेतली होती. मात्र आता या प्रकरणाला कलाटणी मिळाली असून यावेळी व्हायरल झालेल्या चिठ्ठीवरील हस्ताक्षर विवेकचे नसून कोणीतरी खोडसाळपणाने चिठ्ठी लिहून ती विवेकची असल्याचे भासवल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
या प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांनी महाविद्यालयातून त्याच्या उत्तरपत्रिका हस्तगत केल्या. ती चिठ्ठी व उत्तरपत्रिका हस्ताक्षर तज्ज्ञाकडे पाठवण्यात आल्या. यावेळी चिठ्ठीतील हस्ताक्षर हे विवेकचे नसल्याचा निर्वाळा तज्ज्ञांनी दिला आहे. आता हा खोडसाळपणा करत राज्यात खळबळ उडवून कोणी दिली, याचा तपास पोलीस करत असून अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मागील दोन दिवसांपासून केतुरा या गावाला छावणीचे रूप आले होते. विवेकच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी राज्यभरातून प्रतिष्ठित नागरिक येत होते. या पार्श्वभूमीवर चिठ्ठी लिहून खोडसाळपणा केल्याप्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
ती चिठ्ठी खोडसाळपणातूनच लिहिलेली -
मृत विवेक रहाडे हा वापरत असलेल्या रजिस्टरमध्ये कोणीतरी अज्ञात व्यक्तीने त्याच्या नावाने चिठ्ठी लिहून सामाजिक वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न केलेला आहे. याबाबत आम्ही सर्वतोपरी चौकशी केली. मात्र आम्हाला संशयास्पद काहीच आढळून आलेले नाही. याबाबत आम्ही चौकशी करणार आहोत, असे पोलीस अधीक्षक राजा रामास्वामी म्हणाले.