बीड- शुक्रवारी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संसदेच्या सभागृहात अर्थसंकल्प सादर केला. त्यानंतर सबंध देशभरात सकारात्मक व नकारात्मक प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली. दरम्यान, बीडमध्ये सामाजिक कार्यकर्ते तथा वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींनीही या अर्थसंकल्पावर आपले म्हणणे मांडले. तर जाणून घेऊया, अर्थसंकल्पाबाबत त्यांच्या प्रतिक्रिया.
जाणून घ्या, काय वाटतंय २०१९ च्या अर्थसंकल्पाबाबत सर्वसामान्य नागरिकांना महिला बचत गटाची चळवळ नेटाने चालवणाऱ्या मनीषा तोकले अर्थसंकल्पासंदर्भात बोलताना म्हणाल्या, की एक ते दीड हजार बचत गट गावांमध्ये फिरून उभे केलेले आहेत. एका गटात कमीत कमी १० व जास्तीत जास्त २०-२५ महिला असतात. यापैकी केवळ एकाच महिलेला कर्ज देण्याची तरतूद या अर्थसंकल्पात होत असेल तर हे चुकीचे वाटते. ग्राऊंड लेवलवर काम करताना केवळ एका महिलेला कर्ज दिले तर इतर महिलांमध्ये फूट पडू शकते. त्यामुळे अशा पद्धतीचे धोरण बचत गटांना तारणारे असू शकत नाही. हा अर्थसंकल्प बचत गटांसाठी निव्वळ लॉलीपॉप आहे, असे मनीषा तोकले यांनी सांगितले.
कृषी क्षेत्रात काम करणारे सामाजिक कार्यकर्ते संजय शिंदे म्हणाले, की सबंध देशाचा जीडीपी हे सरकार मांडत आहे. मात्र, केवळ शेतकरी वर्गाचा जीडीपी पाहिला तर प्रचंड प्रमाणात घसरलेला आहे. ती परिस्थिती लक्षात घेऊन अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रासाठी तरतूद होणे गरजेचे होते. मात्र, तशा पद्धतीने कुठलाच निर्णय मोदी सरकारने अर्थसंकल्पात घेतलेला नाही.
कामगारांच्या संदर्भाने कॉम्रेड मोहन जाधव यांनी विश्लेषण करताना सांगितले, की कामगारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अथवा कामगारांच्या पेन्शन संदर्भात कुठलीच भक्कम तरतूद या अर्थसंकल्पात झालेली नाही. सोन्या, चांदीवर कर वाढ करण्याचा घेतलेला निर्णयाबाबत सांगताना सामाजिक कार्यकर्त्या सीता बनसोड म्हणाले, की सोन्याचा दागिना हा महिलांसाठी उत्सुकतेचा विषय असतो. ती महिला श्रीमंत असो की गरीब आपापल्या परिस्थितीनुसार सोन्याचे दागिने करण्याचा प्रत्येक महिलेचा प्रयत्न असतो. त्यामुळे जर अशा पद्धतीने कर वाढ होत असेल तर गोरगरीब माणसांना अथवा लग्नासाठी दागिने खरेदी करणे शक्य होणार नाही. तर डिझेल पेट्रोल दरवाढीबाबत तत्वशील कांबळे यांनी नाराजी व्यक्त केली.
या सगळ्या चर्चेच्या शेवटी ज्येष्ठ पत्रकार संजय मालाणी यांनी या अर्थसंकल्पातील सकारात्मक व नकारात्मक दोन्ही बाजू स्पष्ट केल्या. धनदांडग्यांना आकारलेला कर यामधून उत्पन्न वाढेल ही सकारात्मक बाब या अर्थसंकल्पात आहे. याशिवाय इंदिरा गांधी यांच्यानंतर पहिल्यांदाच एका महिलेने हा अर्थसंकल्प सादर केला आहे. याचे समाधान आहे. ही सकारात्मक बाजू मांडताना संजय मलानी यांनी नकारात्मक बाजूवरही प्रकाश टाकला. कृषी उद्योग, व्यापार, दळणवळण आदी क्षेत्रात २०१९ च्या अर्थसंकल्पाने अपेक्षाभंग झाला आहे, असे ते म्हणाले.