बीड- जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली असून दूरवरून दुचाकीवर पाणी आणताना पाण्याची टाकी (बॅरल) अंगावर पडून एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी पहाटे बीड तालुक्यात घडली. मीनाक्षी अनुरथ घुगे (वय 26, रा. गुंजाळा, ता. बीड ) असे मृत महिलेचे नाव आहे.
बीडमध्ये पाणी टंचाईचा तिसरा बळी; पाण्याची टाकी अंगावर पडून महिलेचा मृत्यू
जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली असून दूरवरून दुचाकीवर पाणी आणताना पाण्याची टाकी (बॅरल) अंगावर पडून एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी पहाटे बीड तालुक्यात घडली. मीनाक्षी अनुरथ घुगे (वय 26, रा. गुंजाळा, ता. बीड ) असे मृत महिलेचे नाव आहे.
गुंजाळा परिसरात सध्या तीव्र पाणीटंचाई आहे. ग्रामस्थ मिळेल तेथून पाणी आणत आहेत. प्रशासनाने टँकर सुरू केले असले, तरी हा पाणीपुरवठा अपुरा ठरत आहे. रविवारी पहाटे मीनाक्षी घुगे या पती अनुरथ घुगे यांच्यासोबत पाणी आणण्यासाठी दुचाकीकरुन त्यांच्या आडगाव शिवारातील शेतात गेल्या होत्या. तेथे एका ड्रममध्ये पाणी भरून घुगे दाम्पत्य घरी परतत होते. याचदरम्यान धावत्या दुचाकीवरून मीनाक्षी घुगे पाण्याच्या ड्रमसह रस्त्यावर पडल्या.
तेव्हा पाण्याचा ड्रम त्यांच्या अंगावर पडला. यात त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांचे पती अनुरथ घुगे हेही जखमी झाले. तेव्हा तातडीने दोघांनाही उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासाअंती मीनाक्षी घुगे यांना मृत घोषित केले. पती अनुरथ यांच्यावर बीडमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची नोंद पोलिसात करण्यात आली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे