बीड Fake Document for Compensation : पैशासाठी कोणता माणूस कोणत्या थराला जाईल हे सांगता येत नाही. असाच एक धक्कादायक प्रकार बीडच्या गेवराई तालुक्यातील निपाणी जवळका या गावांमध्ये घडलाय. भूसंपादनातून अधिकचा मोबदला मिळावा यासाठी न्यायालयाची कागदपत्रे बदलल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. या अगोदर त्या शेतकऱ्याला 2016 मध्ये बीडच्या न्यायालयानं निकाल दिला. परंतु, यामधील सहा मुख्य पानं बदलण्यात आली. हा प्रकार 2016 ते 2022 या कालावधीत घडला. यामधील सहाय्यक सरकारी वकील यांना ही माहिती समजताच त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली, त्यानंतर न्यायालयाच्या वतीनं कार्यालयीन अधीक्षकांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. चक्क न्यायालयाची कागदपत्रे बदलत आल्यानं न्यायालयात एकच खळबळ उडालीय.
नेमकं प्रकरण काय : बीडच्या गेवराई तालुक्यातील निपाणी जवळका या गावाच्या शिवारात पाझर तलावाच्या संपादित जमिनीच्या तक्रारदाराला भूसंपादन अधिकाऱ्यानं निधी मंजूर केला होता. नुकसान भरपाईच्या पोटी त्यांना काही रक्कमदेखील मिळाली. मात्र त्यामध्ये शेतकऱ्याची नाराजी असल्यानं यासाठी त्यांनी पाच प्रकरणे दाखल केली होती. त्यानुसार 2 जुलै 2016 रोजी तत्कालीन सह दिवाणी न्यायमूर्ती व सरन्यायाधीश साजिद आरिफ सय्यद यांनी हे प्रकरण निकाली काढले होते. त्यानंतर न्यायालयाच्या कागदपत्रात नेमका फेरबदल हा कोणी केला असा प्रश्न यानिमित्तानं उपस्थित झालाय.