बीड -जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात पिंपळा येथे एक कोरोनाग्रस्त आढळून आल्यानंतर आरोग्य प्रशासनाने त्या कोरोनाग्रस्ताच्या संपर्कात आलेल्या एकूण 6 व्यक्तींचे नमुने प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठवले होते. शुक्रवारी सायंकाळी सहाही जणांच्या तपासणीचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असल्याने बीडकरांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
बीडमध्ये सापडलेल्या त्या कोरोनाग्रस्तावर नगरमध्ये उपचार सुरू आहेत. बीडमध्ये अद्यापपर्यंत जिल्ह्यातील इतर दहा तालुक्यांमध्ये एकही कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आलेला नाही. बीड जिल्हा रुग्णालयात या घडीला सात रुग्ण आयसोलेट असल्याचे शल्यचिकित्सक डॉक्टर अशोक थोरात यांनी सांगितले.
बीड जिल्हा आरोग्य विभागाकडून आतापर्यंत 109 तपासण्यात आले आहेत. नगर व बीड जिल्ह्याच्या सीमेवर पिंपळा या गावातील आढळलेल्या त्या कोरोनाच्या रुग्णाव्यतिरिक्त बीड जिल्ह्यात आतापर्यंत एकही रुग्ण आढळून आलेला नाही. पिंपळा येथील तो कोरोनाग्रस्त रुग्ण नगर येथील शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहे. त्या रुग्णाच्या संपर्कातील इतर सहा जणांचे नमुने गुरुवारी प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठवले होते.
शुक्रवारी सायंकाळी या सहा जणांचा रिपोर्ट जिल्हा रुग्णालय प्रशासनाला प्राप्त झाले असून त्या सहाही जणांचे अहवाल निगेटिव्ह असल्याने बीडकरांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. आरोग्य प्रशासन व पोलीस प्रशासन मोठ्या धैर्याने कोरोना विषाणुशी लढा देत आहेत. लॉकडाउनदरम्यान नागरिकांनी घरात बसून सहकार्य करावे, असे आवाहन शल्यचिकित्सक डॉक्टर अशोक थोरात व पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी केले आहे.