बीड- माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या पराभवाचे विश्लेषक वेगवेगळ्या बाजूने विश्लेषण करत आहेत. जनतेच्या मनातल्या मुख्यमंत्री असलेल्या पंकजा मुंडे यांना जनतेने का नाकारले? याबाबत तीन मुद्याभोवती चर्चा होत आहे. पहिला मुद्दा म्हणजे जनतेशी तुटलेली नाळ, अतिआत्मविश्वास आणि अहंकार या तीन गोष्टीमुळे पंकजा मुंडे यांचा 30 हजारांहून अधिक मतांनी पराभव झाला आहे.
मनातल्या मुख्यमंत्री म्हणून राज्याच्या नेतृत्वाची अपेक्षा ठेवून काम करणाऱ्या पंकजा मुंडे यांना जनतेने नाकारले आहे. यामागची अनेक वेगवेगळी कारणे राजकीय विश्लेषकांनी सांगितली आहेत. गोपीनाथ मुंडे यांचा बालेकिल्ला म्हणून परळी विधानसभा मतदारसंघ ओळखला जातो. मुंडे यांच्या निधनानंतर त्यांची कन्या पंकजा मुंडे यांच्याकडून परळी विधानसभा मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेच्या अपेक्षा पूर्ण होतील असे काम पंकजा मुंडे यांच्याकडून झाले नाही, हे खरे आहे. याउलट विरोधी पक्षात असताना धनंजय मुंडे यांनी परळीच्या जनतेची किती कामे केली, यापेक्षा प्रत्येकाशी संवाद धनंजय यांनी कायम ठेवला. याचाच परिणाम पंकजा मुंडे यांना पराभवाला सामोरे जावे लागले.
'भावनिक राजकारणाला परळीच्या जनतेने लाथाडले'
उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासूनच पंकजा मुंडे यांच्या भाषणात जनतेला अहंकार दिसत होता. जे मी करू शकले ते कोणीच करणार नाही. मीच जिल्ह्याचा विकास केला, माझ्यामुळेच रेल्वे आली, मीच ऑनलाईन शिक्षकांच्या बदल्या करून शिक्षकांना न्याय दिला, मीच दहा हजार कोटी रुपयांची विकासकामे करू शकते. या 'मी' पणाच्या गोष्टींमुळे पंकजा मुंडे यांचा अहंकार स्पष्टपणे जनतेला जाणवला. तिसरी गोष्ट म्हणजे, राजकारणात गाफील राहून चालत नाही. परळी मतदारसंघात बोटावर मोजण्या इतक्याच लोकांचा कोंडवळा घेऊन त्या म्हणायच्या की 'माझा विजय कोणी रोखू शकत नाही. त्यांचा हाच आत्मविश्वास त्यांना नडला.
2014ला राज्यात मोदी लाट होती याशिवाय बीड जिल्ह्यात स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या निधनामुळे जनतेने पंकजा मुंडे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून निवडून दिले. 2019 मध्ये मात्र राज्यातली मोदी लाट ओसरली, याशिवाय भावनिक राजकारणाचा फंडा चालला नाही. परिणामी जनतेच्या मनातल्या मुख्यमंत्री पंकजा मुंडे यांना जनतेने घरी बसवले, असे राजकीय विश्लेषकांमधून बोलले जात आहे.
हेही वाचा - परळीच्या जनतेचा विश्वास वाया जाऊ देणार नाही- धनंजय मुंडे