बीड- जिल्ह्याच्या राजकारणाची समिकरणे दिवसेंदिवस बदलत आहेत. ५ दिवसांपूर्वी आमदार जयदत्त क्षीरसागर यांनी भाजपच्या उमेदवार प्रीतम मुंडे यांना जाहीर पाठिंबा दिला होता. मात्र, जयदत्त क्षीरसागर यांचे समर्थक आणि मुस्लीम समाजामधील मोठे प्रस्त असलेले अॅड. शेख शफिक यांनी शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे बीड लोकसभा मतदारसंघातील उमेदवार बजरंग सोनवणे यांना जाहीर पाठिंबा दिला आहे.
जैन भवन, बीड येथे ७ एप्रिल रोजी मुस्लीम समाजाची बैठक झाली. या बैठकीला बीड शहर व जिल्ह्यातील मुस्लीम समाजाचे युवक व ज्येष्ठ नागरिक यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. याप्रसंगी शेख शाफिक यांनी सर्व मुस्लीम बांधवांचे मत जाणून घेतले. तेव्हा धर्मांध शक्तीबरोबर मुस्लीम समाज कधीच जाणार नाही, अशी भूमिका समाजातील नागरिकांनी घेतल्यामुळे शेख शफिक यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला जाहीर पाठिंबा देण्याचा निर्णय शुक्रवारी जाहीर केला.
शफिक यांच्या भूमिकेमुळे भाजपच्या उमेदवार प्रीतम मुंडे यांना फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. दिवसेंदिवस बीड लोकसभेची लढत अधिक तुल्यबळ होत आहे. शेख शफीक हे विद्यार्थी चळवळीतून राजकारणात आलेले आहेत. केवळ मुस्लीमच नाही तर, इतर समाजामध्येदेखील त्यांच्याबाबत सहानुभूती असलेले नेते अशी ओळख आहे. आमदार क्षीरसागर यांचे खंदे समर्थक आहेत. मात्र, त्यांनी क्षीरसागर यांना बीड लोकसभेसाठी राष्ट्रवादीला पाठिंबा दिला आहे.
शेख शफिक यांच्या भूमिकेमुळे पंकजा मुंडे यांच्या अडचणीत भर पडली आहे. यापूर्वी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्यामुळे बीड जिल्ह्यातील मुस्लीम मते भाजपला पडत होती. मात्र, आता मुस्लीम समाजातील नेते जाहीरपणे राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा देत आहेत. क्षीरसागर यांच्यामुळे काही प्रमाणात मुस्लीम मतदान भाजपला होईल अशी शक्यता होती. मात्र, शेख शफिक यांच्या भूमिकेमुळे तशी शक्यता नसल्याचे राजकीय विश्लेषक सांगत आहेत.