बीड- जिल्ह्यातील कोल्हारवाडी येथील चारा छावणीत गैरप्रकार उघडकीस आल्यानंतर आयुक्त कार्यालय, औरंगाबाद येथील पथकाने सोमवारी ७० छावण्यांना अचानक भेट दिली. यावेळी जनावरांची संख्या आणि इतर सुविधांची तपासणी करण्यात आली. जिल्ह्यात ६५० हून अधिक चारा छावण्या सुरू आहेत.
आयुक्त कार्यालयाच्या पथकाकडून बीड जिल्ह्यातील छावण्यांची अचानक तपासणी
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनी बीड तालुक्यातील कोल्हारवाडी येथील चारा छावणीवर एका महिला उपजिल्हाधिकारी यांना चारा छावणीची तपासणी करण्यापासून रोखले होते.
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनी बीड तालुक्यातील कोल्हारवाडी येथील चारा छावणीवर एका महिला उपजिल्हाधिकारी यांना चारा छावणीची तपासणी करण्यापासून रोखले. याचाच परिणाम की काय म्हणून विभागीय आयुक्त कार्यालयाने हे प्रकरण गांभीर्याने घेतले असल्याचा प्रत्यय सोमवारी आला. जवळपास २० अधिकाऱ्यांचे एक पथक बीड जिल्ह्यात अचानक आले. पथकाने वेगवेगळ्या तालुक्यातील ७० च्या जवळपास छावण्यांना अचानक भेटी देऊन तपासणी केली.
विभागीय आयुक्त कार्यालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी तपासणी पथकातील अधिकाऱ्यांशी सविस्तर बैठक झाल्यानंतरच ज्या छावण्यांमध्ये जनावरांची तफावत आढळून आली आहे. त्यांच्यावर कारवाई होणार आहे. याबाबत बीड जिल्हाधिकारी यांना कारवाई करण्याचे अधिकार आहेत, असेही संबंधित अधिकारी यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले.