बीड- मनात जिद्द व चिकाटी असली की, कुठलीच बंधने तुम्हाला यश मिळवण्यापासून रोखू शकत नाहीत. लॉकडाऊनमुळे पुण्यात असलेली नोकरी गमावलेल्या बीडच्या एका तरुणाने गावाकडे आल्यानंतर चक्क गाईच्या गोठ्यातून ग्राफिक्स सॉफ्टवेअरची निर्मिती केली आहे. त्याच्या या आगळ्यावेगळ्या संकल्पनेचा ईटीव्ही भारतने घेतलेला हा आढावा.....
दादासाहेब भगत असे या तरुणाचे नाव असून तो बीड जिल्ह्यातील पाटण सांगवी येथील रहिवासी आहे. कॉम्प्युटर क्षेत्रात केवळ आयटीआय झालेला हा तरुण प्रचंड जिद्दी असल्याचा प्रत्यय आला आहे. दादासाहेब याने 'डूग्राफिक्स' या नावाने ग्राफिक्स सॉफ्टवेअर बनवले आहे. सध्या या क्षेत्रात 'कॅनवा' नावाची ऑस्ट्रेलियन कंपनी सेवा देत आहे. त्यांना प्रतिस्पर्धी कंपनी म्हणून हे 'डूग्राफिक्स' काम करणार आहे. आयटीआय झालेल्या दादासाहेबने पुण्यातील एका अॅनिमेशन कंपनीत काम केले आहे. लॉकडाऊनच्या काळात त्याची नोकरी गेली. त्यामुळे त्याला आपल्या गावी परत यावे लागले. गावी आल्यानंतर स्थानिक मुलांना प्रशिक्षण देऊन त्याने गोठ्यात आपली संगणक प्रयोगशाळा उभारली. तेथेच त्याने 'डूग्राफिक्स' हे सॉफ्टवेअर तयार केले. हे सॉफ्टवेअर बनवण्यासाठी त्याने आपली आतापर्यंतची कमाई खर्च केली. लॉकडाऊनमुळे स्वत: बेरोजगार झालेल्या दादासाहेबने आपल्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून २० ते २५ लोकांना रोजगार दिला आहे.
दरम्यान, पुढील एका वर्षात यामधून आणखी एक हजार तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा मानस दादासाहेब भगत याने व्यक्त केला. सध्या कोरोनामुळे जे उद्योग धंदे बंद झाले आहेत, त्यांना मार्केटिंग आणि ब्रॅण्डिंगसाठी हा प्लॅटफॉर्म मदत करेल, असे दादासाहेब यांना वाटते.