बीड- मागील दीड वर्षापासून माहेराहून पैसे आण म्हणून विवाहितेचा सासरच्या मंडळीकडून सतत छळ होत होता. छळाला कंटाळलेल्या विवाहितेने अखेर सॅनिटायझर पिऊन आत्महत्या केल्याची घटना बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील धनगर जवळका येथे घडली आहे. विवाहितेने विषारी द्रव प्राशन केल्याचे उघड होऊ नये व शवविच्छेदन टाळण्यासाठी सासरकडील मंडळींनी तिचा कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा बोगस रिपोर्ट बनवला. मात्र माहेरच्या लोकांच्या सतर्कतेमुळे हा बनाव फसला असून, याप्रकरणात पतीसह सासरच्या चौघांवर पाटोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
कार घेण्यासाठी देत होते त्रास
पूजा गणेश रायकर (वय २१, रा. धनगर जवळका ता. पाटोदा) असे मृत विवाहितेचे नाव आहे. पूजाचे माहेर अंबाजोगाईचे आहे. तिचे वडील बिभीषण महादेव शेवाळे यांच्या फिर्यादीनुसार पूजाचा विवाह दोन वर्षापूर्वी गणेश शिवाजी रायकर याच्यासोबत झाला होता. गणेश पुण्यात एका खासगी वाहतूक कंपनीत कामाला आहे. लग्नानंतर सुरुवातीचे दीड वर्ष चांगले गेले. त्यानंतर तुला अजूनही मुलबाळ होत नाही असे पती गणेश, सासरा शिवाजी अर्जुन रायकर आणि सासू विजुबाई हे सतत तिला हिणवू लागले. कार घेण्यासाठी माहेराहून अडीच लाख रुपये घेऊन ये असा तगादा तिच्यामागे लावला. सहा महिन्यांपूर्वी पूजाच्या आई-वडिलांनी आर्थिक परिस्थिती बिकट असून आणखी एका मुलीचे लग्न करायचे बाकी आहे, पैसे आल्यास आम्ही तुम्हाला गाडीसाठी पैसे देऊ, असे पूजाच्या सासरच्यांना सांगितले.
छळाला कंटाळून प्राशन केले सॅनिटायजर
एप्रिल महिन्यात लॉकडाऊनमुळे गणेश पूजासह गावी धनगरजवळका येथे परतला. तिथे आल्यावर त्याने आई-वडिलांच्या मदतीने कारच्या पैशासाठी पूजाला सतत मारहाण, शिवीगाळ करून तिचा छळ सुरु केला, तिला उपाशी ठेवू लागले. सततचा छळ असह्य झाल्याने पूजाने बुधवारी (१९ मे) दुपारी तीन वाजता वडिलांना शेवटचा कॉल केला आणि त्यानंतर तिने सॅनिटायजर प्राशन केले. तिला अत्यवस्थ अवस्थेत अहमदनगर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर मंगळवारी (२५ मे) रात्री आठ वाजता गणेशचा मावस भाऊ नामदेव हरिभाऊ सुडके हा रुग्णवाहिका घेऊन तिथे आला. पुण्यात माझी लॅब असल्याने खासगी रुग्णालयात माझे संबंध आहेत, उपचार चांगले होतील असे म्हणत त्याने पुजाला नेऊन पुण्यातील रुग्णालयात दाखल केले. तिथे बुधवारी (२६ मे) पहाटे ४ वाजता पूजाचा उपचार सुरु असताना मृत्यू झाला.