बीड- महिलाचे स्वतंत्र अस्तित्व मान्य न होणारी मानसिकता समाजामध्ये मोठ्या प्रमाणात बळावत आहे. खोट्या प्रतिष्ठेत जगण्याचा अट्टहास करणाऱ्या कुटुंबामध्ये महिलेचा छळ होण्याचे प्रमाण मागच्या पाच वर्षात ४५ टक्क्यांवरून चक्क ६० टक्क्यावर गेले असल्याचे विदारक सत्य समोर आले आहे. बीड जिल्ह्यातील कौटुंबिक हिंसाचाराच्या शिकार बनलेल्या महिलांसाठी काम करणाऱ्या बनसारोळा विकास मंडळाच्या समुपदेशकांनी मागील २५ वर्ष केलेल्या कामासह पाहणीतून ही बाब स्पष्ट झाली आहे. विशेष म्हणजे कुटुंबात केवळ सुनेवरच अन्याय, अत्याचार होतो असे नाही, तर जन्मदात्या आई-वडिलांनीदेखील आपल्या अल्पवयीन मुलींचा छळ केल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. या कौटुंबिक हिंसाचाराला बळी पडलेल्या आणि नव्याने आयुष्य जगण्यासाठी धडपडणाऱ्या महिलांच्या, मुलींच्या समस्येचा 'ईटीव्ही भारत' आढावा घेतला आहे.
हेही वाचा -अभिनेत्यासह दिग्दर्शकाला चित्रपट गृहासमोरच मारहाण
बीड जिल्हा ऊसतोड मजुरांचा जिल्हा म्हणून सर्वदूर परिचित आहे. शिक्षणाचा अभाव, कुटुंबाची खोटी प्रतिष्ठा, बळावलेली संशयी वृत्ती आणि महिलांचे स्वतंत्र आयुष्य मान्य नसणे, यासारख्या अनेक कारणांमुळे कुटुंबातील महिला स्वतःला असुरक्षित समजत आहेत. आतापर्यंत सासू-सुनांची भांडणे किंवा सुनेचा सासरी होणारा छळ या घटना अधिक प्रमाणात घडत होत्या. मात्र, आता पोटच्या मुलीचादेखील आई-वडिलांनी छळ केल्यामुळे अल्पवयीन पीडित मुली स्वाधारगृहामध्ये वास्तव्य करत आहेत, अशी माहिती स्वाधार गृहाच्या समुपदेशिका आशा जाधव आणि उषा धनवडे यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना दिली.