बीड -राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये कोरोना पुन्हा एकदा अधिक गतीने पसरत आहे. बीड जिल्ह्यात मात्र अद्यापही कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची परिस्थिती आवाक्यात आहे. पुन्हा लॉकडाऊन नको असेल तर नियम पाळा, अशा सूचना जिल्हाधिकारी कार्यालय प्रशासनाने बीडकरांना दिलेल्या आहेत. या शिवाय धार्मिक स्थळांना नियम पाळण्याबाबत सांगण्यात आले असून, जिल्ह्यात 11 तालुक्यामध्ये दिवसाला 40 ते 50 एवढेच कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळत आहेत. आज घडीला बीड जिल्ह्यात 311 रुग्ण सक्रिय आहेत.
हेही वाचा -भुसावळात नगरपालिका निवडणुकीपूर्वीच राजकीय भूकंप घडवण्यात राष्ट्रवादीला यश!
महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांप्रमाणे बीड जिल्ह्यात संचारबंदी लागणार का? अशी भीती हातावर पोट असलेल्या गोरगरीब नागरिकांच्या मनामध्ये आहे. अशा परिस्थितीत नागरिकांनी नियम पाळावेत असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. बीड जिल्ह्यातील धार्मिक स्थळांना कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर घालून दिलेले नियम काटेकोरपणे पाळण्याबाबत सांगण्यात आले आहे. बीड शहरातील कन्कलेश्वर मंदिर येथे सर्व नियमांचं पालन करत भाविक महादेवाचे दर्शन घेतात, असे येथील पुजारी संजय महाराज गुरव यांनी सांगितले.
भाविकांना प्रसाद दिला जात नाही-
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून मंदिर संस्थांकडून दर्शनासाठी आलेल्या भाविकांना प्रसाद दिला जात नाही. याशिवाय दोन भाविकांमध्ये पाच फुटाचे अंतर ठेवण्यासंदर्भात सूचना केल्या जातात. तसेच मूर्तीला हात लावू दिला जात नाही, अशी माहिती कंकालेश्वर मंदिर संस्थानचे पुजारी संजय गुरव यांनी दिली आहे.