औरंगाबाद - शहरातील गांधीनगर भागात राहणाऱ्या एका 26 वर्षीय तरुणाने रेल्वे समोर उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या तरुणाचे धड सापडले असून डोके घटनास्थळावरून गायब असल्याने पोलीस त्याचा शोध घेत आहेत. मात्र, ही आत्महत्या नसून घातपात असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
हेही वाचा -'संभाजीनगर' नावासाठी भाजप आग्रही, औरंगाबाद महापालिकेत नगरसेवकांचा गोंधळ
गांधीनगर परिसरात राहणाऱ्या चंद्रकांत सूरज जाधव (वय 26) याला लहान भाऊ प्रकाश याने मंगळवारी संध्याकाळी 6 वाजता छावणी येथे राहत असलेल्या बहिणीकडे सोडले. बहिणीकडे रात्री जेवण करून घरी काम असल्याचे सांगून निघालेल्या चंद्रकांतचा संशयास्पद मृत्यू झाला. ही घटना बुधवारी सकाळी 6 वाजता पोलिसांच्या निर्दशनास आली.
हेही वाचा -'निर्णयाचे स्वागत; मात्र, सरकारने 'ते' आश्वासन पाळावे'
या प्रकरणी पोलिसांनी मृताच्या नातेवाईकांना माहिती दिली असता नातेवाईकांनी तो आत्महत्या करू शकत नसल्याचे सांगून त्याच्यासोबत घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला. चंद्रकांतचे धड सापडले असून डोके सापडले नसल्याने हत्येचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, या प्रकरणी छावणी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मनोज पगारे यांनी हा अपघात असून यामध्ये घातपात झाल्याचे प्रथमदर्शनी दिसत नसल्याचे सांगितले. पोलिसांचा तपास सुरू असून सर्व शक्यता तपासल्या जातील, असे सांगितले.