औरंगाबाद- एका युवकाचा विद्यापीठ परिसरातील बंधाऱ्यात मृतदेह शनिवारी (दि. 10 ऑक्टोबर) आढळून आला आहे. विशेष म्हणजे तीन फूट पाण्यात मृतदेह तरंगत होता तर मृतदेहाला दोन्ही कान नाहीत. शिवाय युवकाला पोहता येत असल्याने त्याचा घातपात झाला असल्याचा संशय नातेवाईकांनी पोलिसांकडे व्यक्त केला आहे. समाधान बापूराव गोफने (वय-19 वर्षे, रा. भीमनगर, भावसिंगपुरा), असे मृत तरुणाचे नाव आहे.
भावसिंगपुरा येथे आई, समाधान व त्याचा भाऊ, असे तिघे येथे राहतात. मोलमजुरी करून घराचा गाडा चालवितात. शुक्रवारी (दि.9 ऑक्टोबर) संध्याकाळी चार वाजेच्या सुमारास समाधान घरातून बाहेर पडला. त्याने परिसरातील त्याच्या मित्राकडे जाऊन त्याला एक पॅन्ट दिली. तेव्हापासून तो कोणालाही दिसला नाही. मात्र, शनिवारी संध्याकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यपीठ परिसरातील साई ग्राऊंडजवळ असलेल्या एका पाण्याच्या छोट्या बंधाऱ्यात समाधानचे मृतदेह तरंगत असल्याचे काही नागरिकांना दिसले. त्यांनी ती माहिती पोलिसांसह समधनच्या नातेवाईकांना कळवली.