औरंगाबाद - तरुणाने मोबाईलवर व्हिडिओ शुटींग चालू करून गळफास घेतल्याची घटना न्यायनगर भागात शनिवारी दुपारी घडली. मुकेश सुधाकर साळवे (वय १९ रा. न्यायनगर) असे तरुणाचे नाव आहे. पुंडलिकनगर पोलिसांनी मुकेशचा मोबाईल जप्त केला असून त्यामध्ये ५७ मिनीटांचे शुटींग आढळून आले आहे.
आत्महत्येचा थरार! मोबाईलवर व्हिडिओ शुटींग चालू करून तरुणाने संपवले जीवन - तरुणाची आत्महत्या
या मोबाईलमध्ये ५७ मिनीटांचे शुटींग असून त्यामध्ये पाच ते सात मिनीटाचे शुटींग हे मुकेश गळफास घेतानाचे आहे.
पुंडलिकनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील न्यायनगर भागात सुधाकर साळवे यांचे कुटुंब राहते. पती-पत्नी मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदर निर्वाह करतात. त्यांची तिनही मुले वेगवेगळ्या ठिकाणी कामाला आहेत. तिसऱ्या क्रमांकाचा मुलगा मुकेश हा बीड बायपास भागात वॉशिंग सेंटरवर कामाला होता. शुक्रवारी संपूर्ण कुटुंब कामानिमित्त मूळ गाव निल्लोड (ता. सिल्लोड) येथे गेले होते. शनिवारी सकाळी ९ वाजता घरी परतले. त्यानंतर सर्वजण आपापल्या कामावर गेले. मुकेशला सुटी असल्याने तो घरीच होता. दुपारी १ वाजेच्या सुमारास सुधाकर दुपारच्या जेवणासाठी घरी आले. त्यावेळी मुकेशने घराच्या छताच्या लोखंडी हुकला नायलॉन दोरीने गळफास घेतल्याचे दिसून आले. वडिलांनी तात्काळ घटनेची माहिती पुंडलिक नगर पोलिसांना दिली.
पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मुकेशला फासावरून उतरवून बेशुद्धावस्थेत घाटीत दाखल केले. परंतु डॉक्टरांनी तपासून त्याला ३.३० वाजता मृत घोषित केले. पोलिसांनी घटनास्थळावरून मोबाईल जप्त केला आहे. या मोबाईलमध्ये ५७ मिनीटांचे शुटींग असून त्यामध्ये पाच ते सात मिनीटाचे शुटींग हे मुकेश गळफास घेतानाचे आहे. मुकेशने कोणत्या कारणाने गळफास घेतला हे अद्याप समोर आलेले नाही. या प्रकरणी पुंडलिनगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोहेकॉ कावरे पाटील करीत आहेत.