औरंगाबाद- कोरोना असल्याच्या संशयावरून पुण्याहून गावी आलेल्या युवकाला आणि त्याच्या कुटुंबीयांना गावातील काही युवकांनी मारहाण केल्याची घटना औरंगाबादच्या पैठण तालुक्यात घडली. या हाणामारीत युवकासह पाच जण जखमी झाले आहेत.
पैठण तालुक्यातील सोनवाडी बुद्रुक येथील समीर अन्वर सय्यद हे पुण्यातील एका कंपनीत कामाला आहे. समीर १० मार्चला सोनवाडी येथे परत आले. शुक्रवारी गावातील दुकानात सामान घेण्यासाठी आले असता गावातील काही लोकांनी वाद घालत समीर यांना मारहाण केली. या प्रकरणी पाचोड पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
कोरोनाच्या सावटाखाली असलेल्या पुण्यात अनेकांना वर्क फ्रॉम होम म्हणजेच घरी राहून काम करण्याची मुभा देण्यात आली आहे. तर अनेकांना सुटी देण्यात आली. त्यामुळे समीर 10 मार्च रोजी आपल्या गावी आले होते. शुक्रवारी घरातील सामान घेण्यासाठी ते गावातील दुकानात आले असताना त्यांना गावातील काही लोकांनी अडवले आणि तुला आणि तुझ्या घरातील लोकांना कोरोना झाला आहे. तुम्ही बाहेर यायचे नाही, असे म्हणत वाद घातला. त्यातून वाद सुरू असताना समीरची आई-वडील, बहीण-भाऊ तिथे आले. गावातील काही लोकांमध्ये आणि समीरच्या कुटुंबीयांमध्ये लाठ्या-काठ्याने हाणामारी झाली.
या हाणामारीत समीरच्या कुटुंबीयांसह पाच जण जखमी झाले आहेत. यापैकी समीर सय्यद, अन्वर सय्यद व शबनूर अफरोज शेख या तिघांना गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्यावर पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पाचोड पोलिसात प्रकरणाची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहे.
हेही वाचा -औरंगाबाद बाजार समितीमध्ये नागरिकांची गर्दी, बंदोबस्तासाठी पोलिसांना पत्र