औरंगाबाद - चिनी राख्यांना ब्रेक लावण्यासाठी बाजारात पर्यावरणपूरक राख्या आणण्यात आल्या आहेत. शहरात गरजू महिलांच्या माध्यमातून बी-बियाणांच्या राख्या तयार करण्यात आल्या आहेत. औरंगाबादच नाही तर अनेक राज्यांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या राख्या तयार करण्यात आल्या आहेत. या माध्यमातून महिलांना रोजगार उपलब्ध होण्यासही मदत होणार आहे.
या उपक्रमाबाबत प्रतिनिधी अमित फुटाणे यांनी घेतलेला आढावा. राखी पौर्णिमेला राखीचे वेगळेच महत्व असते. मात्र, बांधलेल्या राखीपेक्षा बहीण भावाचे नाते घट्ट असते. औरंगाबादमधे सामाजिक संस्थांच्या मदतीने गरजू महिलांना एकत्र करण्यात आले. या महिलांच्या माध्यमातून पर्यावरणपूरक राख्या तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले. बहीण भावाचे हे जाते निसर्गाशी जोडले जावे, यासाठी भाजीपाल्याच्या बियांपासून राख्या तयार करण्यात आल्या आहेत. या माध्यमातून टेरेस गार्डन संकल्पना ही वाढण्यास मदत होणार आहे. तसेच राखीच्या माध्यमातून आलेली झाडे बघून बहीण-भावाच्या नात्यालाही वेगळे महत्व मिळेल. त्यामुळे झाडांच्या बियांच्या राख्या बाजारात आणल्या आहेत. तर मातीच्याही विशेष राख्या तयार करण्यात आल्या आहेत.
यावर्षी राखी पौर्णिमेला बहिणीकडून भावांना फक्त राखी नाही तर त्याचबरोबर पर्यावरण पूरक भेटवस्तूही मिळणार आहे. यात एक बॉक्स तयार करण्यात आला आहे. ज्यामध्ये 18 प्रकारच्या विविध भाज्यांच्या बिया, दोन शुभेच्छा पत्र, हळदी कुंकू आणि अक्षदा, पूजेसाठी लागणारी सुपारी यांच्यासह वेगवेगळ्या प्रकारच्या झाडांच्या बिया असलेल्या तीन राख्या देण्यात आल्या आहेत.
लॉकडाऊनमुळे अडचणीत आलेल्या महिलांना रोजगार देण्याचे काम या माध्यमातून करण्यात आले आहे. बहिण-भावाच्या नात्याला वेगळे महत्त्व देण्यासाठी हा उपक्रम राबवला आहे. विशेषतः चिनी राख्या मोठ्या प्रमाणात विकल्या जातात. त्यांना आळा घालण्यासाठी पर्यावरण पूरक राख्या बाजारात आणल्या आहेत. यामाध्यमातून औरंगाबाद शहरातुन राज्यातील अनेक शहरांमध्ये राख्या पाठवण्यात आल्या आहेत. यात सीमेवरील जवांनाचादेखील समावेश आहेत. तर आतापर्यंत 22 हजारांपेक्षा जास्त राख्या तयार करण्यात आल्या आहेत. औरंगाबादेत गरजू महिलांच्या माध्यमातून बी - बियाणांचा राख्या तयार करण्यात आल्याची माहिती भाजप महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा विजया रहाटकर यांनी सांगितले. भाजप महिला मोर्चाने देशभरात एक अभियान राबवत आहे. अनेक राज्यांमध्ये याअंतर्गत पर्यावरण पूरक राख्या तयार करण्यात आल्या आहे, अशी माहिती रहाटकर यांनी दिली.
हेही वाचा -प्रतिदिन साडेचार हजारांच्या पुढे रुग्णालयाला खर्च आकारता येणार नाही - आरोग्यमंत्री