औरंगाबाद - जिल्ह्यातील गंगापूरच्या शासकीय रुग्णालयामध्ये एका डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे 20 वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप तिच्या आई-वडिलांना केला आहे. तनुश्री तुपे असे या महिलेचे नाव आहे. प्रसूतीदरम्यान शस्त्रक्रिया करताना डॉक्टर कापसाचा बोळा महिलेच्या पोटात विसरले, यामुळे महिलेला त्रास सुरू झाला. यानंतर उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यातील गंगापूरच्या शासकीय रुग्णालयात 22 जुलै रोजी तनुश्री या प्रसुतीसाठी दाखल झाल्या होत्या. 23 जुलैला तनुश्री यांचे सिजरींग करण्यात आले. तनुश्री यांनी एक गोंडस मुलाला जन्म दिला. नंतर त्यांना घरी सोडण्यात आले. यानंतर दोन दिवस त्यांनी बाळाला दूध देखील पाजले, मात्र त्यानंतर त्यांना असह्य वेदना सुरू झाल्या. म्हणून पुन्हा त्यांच्या आई-वडिलांना त्यांना गंगापूरच्या शासकीय रुग्णालयात तिला नेले. डॉक्टरांनी तनुश्रीची तपासणी केली आणि पुढच्या उपचारासाठी औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात पाठवले. यावेळी उपचारादरम्यान 27 जुलैला तनुश्री यांचा मृत्यू झाला.