औरंगाबाद - चार वर्षांपासून एकतर्फी प्रेम करत असलेल्या प्रेमवीराच्या त्रासाला कंटाळून आडुळ तांडा (ता.पैठण) येथे एका सतरा वर्षीय महाविद्यालयीन तरुणीने शेतातील विहिरीत उडी घेवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना बुधवारी(9 ऑक्टोबर) रोजी सांयकाळी चार वाजताच्या सुमारास घडली. यानंतर संतप्त मुलीच्या नातेवाईकांनी तरुणाच्या आजीला जबर मारहाण केली. यात त्यांचे पाच दात पडले आहेत.
आडुळ तांडा येथील तरुणीला याच तांड्यावरील राम शिवाजी चव्हाण हा तरुण गेल्या चार वर्षांपासून त्रासदेत होता. तिने राम त्रास देत असल्याचे आई-वडिलांना सांगितले. त्यामुळे त्यांनी रामला मुलीपासून दुर राहण्यास सांगितले. मात्र, त्याचे त्रास देणे कमी झाले नाही. त्यामुळे तरुणीने रामच्या त्रासाला कंटाळून बुधवारी स्वत:च्या शेतातील विहिरीत उडी घेतली तरुणीला पोहता येत नसल्याने यात तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी, तक्रारदार बाबासाहेब वाल्मिक राठोड यांनी शुक्रवारी पाचोड पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.