औरंगाबाद- लग्न सोहळा सामाजिक संदेश देणारा असावा, या संकल्पनेतून जिल्ह्यातील कोरडे कुटुंबीयाने चक्क लग्न जत्राच भरवली. यामध्ये महाराष्ट्राच्या परंपरेचा प्रसार आणि प्रचार करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
कोरडे दाम्पत्यांनी वऱ्हाड्यांना घडवली 'लग्नजत्रा', लावणी, भारूड, पोतराजासह सामाजिक संदेश देणारे अनेक उपक्रम
लग्न समारंभात येणाऱ्या पाहुण्यांनी भेट वस्तू देऊ नये. त्याबदल्यात जनावरांच्या चाऱ्यासाठी पैसे द्यावेत, असे आवाहनही कोरडे दाम्पत्याने केले होते. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. लग्नसोहळ्यात जमा झालेले जवळपास ७० हजार रुपये शेतकऱ्यांना चारा खरेदीसाठी देण्यात येणार आहेत.
औरंगाबादच्या सिडको येथील रहिवासी विलास कोरडे आणि अलका कोरडे यांच्या मुलीचा विवाह सोहळ्यानिमित्त ही जत्रा भरवण्यात आली होती. खिर्डी गावात ४ एकर शेतात ही लग्नजत्रा आयोजीत करण्यात आली. लग्न समारंभासाठी आलेल्या पाहुण्यांना महाराष्ट्राच्या कलांचे दर्शन व्हावे, कलेचे महत्त्व कळावे यासाठी हा अनोखा उपक्रम राबवण्यात आला. या जत्रेत शेतकऱ्यांनी शेतीवरच अवलंबून न राहता जोड धंदा करावा. तसेच महाराष्ट्राची संस्कृती जपण्याचा संदेश देण्यात आला. महाराष्ट्राच्या लोककलेचे दर्शन घडवण्यात आले. पोतराज, लावणी, भारूड सारख्या कलांचे दर्शन या जत्रेच्या माध्यमातून झाले. एवढेच नाही, तर लहान मुलांच्या मनोरंजनासाठी खेळणी, उंट, जोकरदेखील होते.
लग्नजत्रेच्या माध्यमातून कोरडे यांच्या शेतात वृद्धाश्रमदेखील सुरू करण्यात आले. निराधार वृद्धांना विनःशुल्क येथे राहता येणार आहे. लग्न समारंभात येणाऱ्या पाहुण्यांनी भेट वस्तू देऊ नये. त्याबदल्यात जनावरांच्या चाऱ्यासाठी पैसे द्यावेत, असे आवाहनही कोरडे दाम्पत्याने केले होते. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. लग्नसोहळ्यात जमा झालेले जवळपास ७० हजार रुपये शेतकऱ्यांना चारा खरेदीसाठी देण्यात येणार आहेत. नातेवाईकांना रक्तदान करण्याचेही आवाहन करण्यात आले होते. यामधून जवळपास ५० बाटल्या रक्त जमा झाले. सामाजिक भान जपणाऱ्या आगळ्यावेगळ्या लग्नसोहळ्याच्या नियोजनाने वर आणि वधूने आनंद व्यक्त केला.