औरंगाबाद - शहरातील समर्थनगर भागातील वामन हरी पेठे ज्वेलर्सच्या मॅनेजरने तीन सहकाऱ्यांच्या मदतीने २७ कोटी ३१ लाख रुपयांचे ५८ किलो सोने लंपास केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. याप्रकरणी ४ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी तीन आरोपींना अटक केली आहे.
औरंगाबादेतील वामन हरी पेठे ज्वेलर्सच्या मॅनेजरने ५८ किलो सोने केले लंपास; चौघांविरोधात गुन्हा दाखल - सोने
गेल्या सहा महिन्यांपासून वामन हरी पेठे ज्वेलर्समधील व्यवहारात अनियमितता आढळली. त्यामुळे याबाबत ऑडीट केले असता गैरव्यवहार झाल्याचे समोर आले.
अंकुर राणे, राजेंद्र जैन, लोकेश जैन असे तीन आरोपींची नावे असून यामध्ये एका महिलेचा समावेश आहे. समर्थनगर भागातील पेठे ज्वेलर्समध्ये अंकुर राणे हा मॅनेजर पदावर कार्यरत होता. त्याच्यावर दुकानाची सर्व जबाबदारी सोपविण्यात आली होती. दुकानातील सोने, हिरे, दाग-दागिन्यांची विक्री आणि व्यवहार सर्वकाही राणेच सांभाळत होता. गेल्या सहा महिन्यांपासून दुकानातील व्यवहारात अनियमितता आढळली. त्यामुळे याबाबत ऑडीट केले असता गैरव्यवहार झाल्याचे समोर आले.
पेठे ज्वलेर्सचे मालक विश्वनाथ प्रकाश पेठे यांना याबाबतची माहिती देण्यात आली. त्यांनी शहानिशा केल्यानंतर ५८ किलो सोने लंपास केल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर पेठे यांच्या तक्रारीवरून क्रांतीचौक पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी काही तासात अंकुश राणे, राजेंद्र जैन, लोकेश जैन यांना अटक केली आहे. त्या तिघांनाही आज न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीकांत नवले यांनी सांगितले.