छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) : तीन टग्यांच्या सरकारमुळं शेतकऱ्यांना न्याय मिळत नसल्याचा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय. 1 जानेवारी ते आजर्यंत राज्यात 1 हजार 655 शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपवली. अनेक भागांमध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. संपूर्ण पिकं वाया गेली आहेत, तरी अद्याप शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही. सरकारनं तातडीनं पावले उचलावी, कर्नाटक राज्याप्रमाणे दुष्काळ जाहीर करा, अशी मागणी विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. ते आज छत्रपती संभाजीनगरमध्ये आले असता पत्रकारांशी बोलत होते.
भटक्या समाजासाठी उपोषण करणार :भटके विमुक्त जातीवर होत असलेल्या अन्याय, बोगस कागदपत्र तसंच बंजारा समाजाच्या भावना ऐकून घेतल्याची माहिती यावेळी विजय वडेट्टीवार यांनी दिली. एसटी आरक्षणात घुसघोरी करणाऱ्या जाती आहेत. ओबीसी, ST च्या जागेवर बोगस नागरिकांच्या नियुक्त्या केल्या आहेत. तसंच त्यांच्या विद्यार्थांनी घुसखोरी करून मेडिकल क्षेत्रात जागा बळकावल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केलाय. राजपूत समाजानं भामटा शब्द लावून जागा बळकावल्या, त्यामुळं वंचितांवर अन्याय होत असल्याचं त्यांनी म्हटलंय. आता त्यावर शासनानं कारवाई करावी, नाहीतर मी छत्रपती संभाजीनगरात उपोषणाला बसेन, असा इशारा विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी दिलाय. ओबीसी नेते राजेश राठोड यांना जीवे मरण्याच्या धमक्या येत आहेत, यांना सरकारनं सुरक्षा द्यावी, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केलीय.
ऑनलाईन सुनावणी करावी :आमदार अपात्रतेबाबत ऑनलाईन सुनावणी घेण्याची मागणी करणार आहे. आजकाल न्यायालयीन सुनावणी ऑनलाईन होते, पारदर्शक सुनावणी व्हावी म्हणून लाईव्ह सुनावणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी घ्यावी. ही सुनावणी जनतेला पाहता येईल, असं ते म्हणाले. सध्या राज्यात राजकारणी एकमेकांवर टीका करताना जनावरांच्या नावाचा उल्लेख करत आहेत. एकमेकांना लांडगा म्हणतात, मात्र सत्ताधाऱ्यांपेक्षा लांडगे इमानदार आहेत. ते कष्टाची शिकार खातात, सत्तेत असलेले 3 जण मिळून राज्याची तिजोरी लुटून खात आहेत, असा टोला वडेट्टीवार यांनी केली.