औरंगाबाद - नोकरी लावण्याचे आमिष दाखवून घेतलेले पैसे देण्यास तरुणाने टाळाटाळ केली. त्यामुळे त्याचे अपहरण (Kidnapping) करून दहा लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या दोघांच्या उस्मानपुरा पोलिसांनी (Usmanpura police) आठ तासाच्या आत जालना येथून अटक केली आहे. तसेच अपहरण झालेल्या तरुणाची सुखरूप सुटका केली.
शामराव सिताराम पवार (48, अंबड चौफुली, जालना) आणि शेख फय्याजोद्दीन शेख मेहराजोद्दीन (22, रा. शंकर जीन, जालना) अशी अटकेतील अपहरणकर्त्यांची नावे आहेत. तर किशोर मधुकर अवचरमल (34) याची अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सुखरुप सुटका केल्याची माहिती उस्मानपुरा ठाण्याच्या निरीक्षक गीता बागवडे यांनी दिली. आरोपींना न्यायालयात हजर केल्यानंतर दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
जालना येथून पाठलाग करत पकडले-
उस्मानपुरा पोलीस ठाण्यात मधुकर लहाणु अवचरमल (रा. रमानगर, उस्मानपुरा) यांनी तक्रार दिली होती. त्यात त्यांना रविवारी रात्री दहा वाजता पवार व फय्याज नावाच्या व्यक्तींनी फोनकरून तुमचा मुलगा किशोर मधुकर अवचरमल (३५) यास जालना येथे घेऊन आलो आहेत. मुलगा हवा असेल तर सकाळी दहा वाजेपर्यंत १० लाख रुपये घेऊन या अशी धमकी दिली होती. या प्रकारामुळे घाबरलेल्या मधुकर यांनी पहाटे उस्मानपुरा ठाण्यात धाव घेतली. तेव्हा उपनिरीक्षक प्रविण वाघ यांनी वरिष्ठांच्या आदेशाने गुन्हा दाखल करून घेत तपासाला सुरुवात केली.
निरीक्षक गिता बागवडे यांनी तांत्रिक तपास करीत उपनिरीक्षक वाघ यांच्या पथकाला जालना येथे पाठवले. पथकाने अपहरण केलेल्या किशोरला आरोपी शामराव पवार आणि शेख फय्याजोद्दीन यांच्या तावडीतून सुखरूप सोडवून आणले. ही कामगिरी पोलीस निरीक्षक गिता बागवडे, उपनिरीक्षक प्रविण वाघ, नाईक योगेश गुप्ता, अंमलदार सतीश जाधव, संदीप धर्मे यांनी केली.
नोकरीच्या आमिषाने फसवणूक-
अपहरण केलेल्या किशोरने नोकरी लावण्याचे आमिष दाखवून आरोपी शामराव पवार याच्याकडून पैसे घेतले होते. शामराव याच्या नातेवाईकास नोकरी लागली नाही आणि किशोर याने पैसे देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे आरोपींनी पैसे वसुल करण्यासाठी अपहरण केल्याची पोलिसांकडे कबुली दिली आहे.