औरंगाबाद- उच्च न्यायालयात मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला, ही आनंदाची गोष्ट आहे. मात्र, हे आरक्षण आधीच दिले असते तर माझा मुलगा गेला नसता, असा रोष आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्या उमेश एंडाईत याच्या कुटुंबीयांनी व्यक्त केला. ऑगस्ट 2018 मध्ये औरंगाबादच्या उमेश एंडाईत या युवकाने मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आत्महत्या करत आपली जीवन यात्रा संपवली होती. उमेश बीएस्सीच्या अंतिम वर्षात शिकत होता. शिक्षित असूनही रोजगार मिळत नसल्याने उमेशने आत्महत्या केली होती.
औरंगाबादच्या चिखलठाणा परिसरात राहणाऱ्या एंडाईत कुटुंबीयांच्या डोळ्यात आज अश्रू आलेत. कारण ज्या आरक्षणाच्या मागणीसाठी त्यांच्या मुलाने आत्महत्या केली, त्या मुलाच्या बलिदानाचे चीज झाले आहे. उमेश एंडाईत या युवकाने मराठा क्रांती मोर्चाच्या लढ्यात सक्रिय सहभाग नोंदवला. मात्र, आरक्षणाच्या मागणीसाठी त्याने आत्महत्या केली. उमेशच्या आत्महत्येला अकरा महिने होत आले. न्यायालयाने आरक्षणाचा मार्ग मोकळा केला. आता नोकारीत 12 टक्के आरक्षण देण्यात यावे, असे न्यायालयाने सांगितले. मात्र, हेच जर आधी झाले असते तर, माझा मुलगा गेला नसता, असा रोष उमेशच्या आईने आणि बहिणीने व्यक्त केला. आता आरक्षण आमच्या काय कामाचे? असा प्रश्नदेखील आईने उपस्थित केला.