औरंगाबाद - जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातून सोमवारी २५ कोरोना संशयितांचे स्वॅब घेण्यात आले होते. या सर्वांचे रिपोर्ट ग्रामीण रुग्णालयात प्राप्त झाले, त्यापैकी दोन जणांचे रिपोर्ट पॉझिटिव आले तर 23 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे, आता तालुक्यात कोरोनाग्रस्त रुग्नांची संख्या 20 वर पोहोचली आहे.
औरंगाबाद : कन्नड तालुक्यात दोन रुग्णांची भर... एकूण रुग्णांची संख्या २० वर
मंगळवारी कोरोना तपासणीकरता ज्या २५ जणांचे स्वॅब घेण्यात आले होते. त्यातील २ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून त्या दोघांचाही पॉझिटिव्ह अहवाल हा मृत्यूनंतर प्राप्त झाला आहे. या मृतांमध्ये देवगाव रंगारी येथील महिला आणि कानडगाव येथील एका वाहन चालकाचा समावेश आहे.
सोमवारी ज्या २५ जणांचे स्वॅब घेण्यात आले होते. त्यात कानडगाव वेरुळ व देवगांव रंगारी येथील २३ जण तर, शहरातील पांढरी मोहल्ला येथील कोरोनाबाधिताच्या संपर्कातील दोनजणांचा समावेश होता. त्यांचा रिपोर्ट आज प्राप्त झाला असून यातील २ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
या पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये देवगांव रंगारी येथील एका महिला तसेच कानडगाव येथील एका महिलेचा समावेश आहे. दरम्यान, तालुक्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 20 वर पोहोचली आहे. यात 8 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर, 2 जणांचा मृत्यू झाला असून 10 रुग्णांवर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच, मंगळवारी देवगांव रंगारी येथील कोरोनाबाधिताच्या संपर्कात आलेल्या 2 जणांचे स्वॅब घेण्यात आले असून ते तपासणीकरता पाठवण्यात आले आहेत, अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण पवार यांनी दिली.