छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) Marathwada Mukti Sangram Din :संभाजीनगरातील सिद्धार्थ प्राणी संग्रहालयातील बछड्यांना नामकरण सोहळा चांगलाच चर्चेत राहिलाय. लकी ड्रॉ पद्धतीने आदित्य नावाची चिठ्ठी निघताच ती चिठ्ठी बाजुला टाकून दुसरं नाव ठेवण्यात आलं. यामुळं भाजपा, एकनाथ शिंदे तसेच अजित पवार आदित्य नावाचा तिरस्कार करतात का? असा प्रश्न ठाकरे गटाच्या नेत्यांनी उपस्थितीत केलाय. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मला माहित नाही, असे सांगितले. तर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मला आठवत नसल्याचं उत्तर दिलं.
नेमक काय घडंल :छत्रपती संभाजीनगर शहरातील सिद्धार्थ उद्यानात अर्पिता वाघिणीनं तीन बछड्यांना जन्म दिला होता. यातील एका बछड्याचा मृत्यू झाला. तर समृध्दी नावाच्या वाघिणीने पिवळ्या बछड्याला जन्म दिला होता. या तीन बछड्यांचे नाव ठेवण्याचा सोहळा आज सिद्धार्थ प्राणी संग्रहालयात संपन्न झाला. बछड्यांसाठी नाव सुचवण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. त्यानुसार नागरिकांनी सूचवलेल्या नावांतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चिठ्ठ्या काढल्या. यावेळी वन मंत्री सुधीर मुनगंटीवारही उपस्थित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चिठ्ठी काढली. त्यात श्रावणी नाव चिठ्ठीत आलं. तर अजित पवारांनी काढलेल्या चिठ्ठीमध्ये आदित्य ठाकरे यांचं नाव आलं. मात्र आदित्य नावाची चिठ्ठी हातात येताच अजित पवारांनी हसून ती मुनगंटीवारांना दाखवली. त्यांनी हसून दुसरी काढा, असं हळूच सांगितलं. त्यानंतर दुसरी चिठ्ठी काढण्यात आली. या प्रसंगामुळे सर्वत्र चर्चेला सुरुवात झाली. यावरुन ठाकरे गटाच्या नेत्यांनी मात्र जोरदार टीका केलीय.