औरंगाबाद - परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथील मोबाईल शॉपी फोडून लाखोंचा मुद्देमाल पळवणाऱ्या सराईत गुन्हेगारांना जिल्ह्यातील सिल्लोड येथे मुद्देमालासह जेरबंद करण्यात आले आहे. औरंगाबाद गुन्हे शाखेने या सदरील कारवाई केली आहे. बुधवारी ३ गावठी कट्टे व ११ काडतुसे घेवून जाणाऱ्याला पोलिसांनी सिल्लोड येथील डोंगरगाव फाटा येथे सापळा रचून पकडले होते. यानंतर आज(गुरुवार) मिळालेल्या माहितीनुसार गुन्हे अन्वेषण विभागाने मोबाईल शॉपी फोडणाऱ्यांना जेरबंद केल्याने गेल्या २४ तासात दुसरे मोठे यश गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आज (गुरुवार) औरंगाबाद स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक भागवत कुंदे यांना स्थानिक गुन्हे शाखा परभणी येथून फोन आला. यात गंगाखेड जिल्हा परभणी येथे मोबाईल शॉपी फोडून लाखो रुपयांच्या मोबाइल हँडसेट्सची चोरी करून ३ चोरटे पळाल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच ते चोरटे एका चारचाकी वाहनाने जालना-भोकरदन- सिल्लोडमार्गे मालेगाव येथे जात असल्याचे त्यांनी सांगितले. त्या अनुषंगाने सदर वाहनाच्या वर्णनासह सिल्लोड शहर पोलिसांना तत्काळ माहिती देण्यात आली. त्यावरून पोलीस उपनिरीक्षक बालाजी ढगारे व त्यांच्या सोबतच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी सिल्लोड-भोकरदन मार्गावर नाकाबंदी लावली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी या रस्त्यावर एका संशयित वाहनास अडवून झडती घेतली. यावेळी त्या वाहनात अकबर खान आमिर खान (वय 30), अफसर खान हबीब खान (वय 26) दोघे रा. पवारवाडी, पोलीस ठाण्यासमोर मालेगाव, जिल्हा नाशिक आणि सय्यद हुसेन सय्यद हबीब (वय 21) रा. शब्बीर नगर, मालेगाव असे ३ जण मिळून आले.
आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून १ महिंद्रा एक्स युव्ही चारचाकी वाहन, मोबाईल शॉपी फोडून चोरलेले वेगवेगळ्या कंपनीचे ६३ मोबाईल हँडसेट, १ एचपी कंपनीचा लॅपटॉप आणि रोख रक्कम असा एकूण २५ लाख ५० हजार १६६ रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला. हे तीनही आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्याकडून अशाच प्रकारचे आणखी गंभीर स्वरूपाचे गुन्हे उघडकीस येण्याची दाट शक्यता असल्याचे पोलिसांनी सांगितले.