छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद):जिल्ह्याला नाथांची भूमी म्हणून ओळखले जाते. एकनाथ महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पैठण येथून गेल्या 424 वर्षांपासून पंढरपूरच्या दिशेने पालखी काढण्यात येते. आषाढी एकादशीच्या एकोणवीस दिवस आधी नाथांच्या पादुका असलेली पालखी रथातून मार्गस्थ होतात. रोज रात्री पालखी मुक्काम असलेल्या ठिकाणी सर्व प्रथम आरती केली जाते. त्यानंतर पांडुरंगाचे नामस्मरण, भजन कीर्तन करत सोहळा साजरा केला जातो. पैठण ते पंढरपूर एकोनाविस दिवसांचा प्रवास भक्तिमय वातावरणात, देवांचे नामस्मरण करत पूर्ण केला जातो. या काळात वारकऱ्यांमध्ये वेगळा उत्साह दिसून येतो, बहुतांश वारकरी वृध्द असले तरी त्यांना थकवा जाणवत नाही अशी महती वारकरी सांगतात.
चार रिंगण होणार:राज्यातील तिसरी मानाची पालखी म्हणून मान असणाऱ्या एकनाथ महाराजांची पालखी शनिवारी सायंकाळी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाली. एकोणाविस दिवस प्रवास करत असताना भक्तांना भावणारा सोहळा म्हणजे रिंगण.. नाथ महाराजांचे प्रस्थान झाल्यावर प्रवासात चार रिंगण सोहळे होतात, वारकऱ्यांना भवणाऱ्या सोहळ्यात मोठ्या संख्येने भाविक सहभाग घेतात. या सोहळ्यात तीन गोल तर एक उभे रिंगण सोहळा पार पडतो. तर पैठण येथून प्रवास सुरू होत असताना जवळपास 45 दिंडी रथासोबत यंदा जात आहेत अशी माहिती नाथ महाराजांचे वंशज योगेश गोसावी यांनी दिली.