औरंगाबाद -सीसीटीव्हीच्या मदतीने जिन्सी गुन्हे शोध पथकाने 2 अट्टल गुन्हेगारांना अटक केली असून त्यांच्या जवळील ४ लाखांचा मुद्देमालही जप्त केला आहे. त्यांच्यावरील जिन्सी पोलीस ठाणे येथील १ गुन्हा, फुलंब्री पोलीस ठाण्यातील १ आणि जवाहर नगर पोलीस ठाण्यातील 1 असे एकूण 3 गुन्हे उघडकीस आणण्यात जिन्सी पोलिसांना यश आले आहे. सचिन सुधाकर दवंगे पाटील (वय 27) आणि उमेश देविदास मुळे (वय 45) दोघेही राहणार कैलासनगर औरंगाबाद, अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
सीसीटीव्हीच्या मदतीने दोन अट्टल चोर गजाआड, जिन्सी पोलिसांची कारवाई - औरंगाबाद चोरी बातमी
जिन्सी गुन्हे शोध पथकाने सीसीटीव्हीच्या मदतीने 2 अट्टल गुन्हेगारांना अटक केली आहे. पोलिसांनी त्यांच्या जवळून 4 लाखांचा मुद्देमाल जप्त करत विविध पोलीस ठाण्यात दाखल असेलेले 3 गुन्हे उघडकीस आणले आहे.
27 डिसेंबरला कैलास नगर भागात राहणाऱ्या संदीप किशोर सरीन यांनी त्यांचा 4 लाख रुपये किंमतीचा 407 टेम्पो अज्ञात व्यक्तीने चोरून नेल्याची तक्रार जिन्सी पोलीस ठाण्यात दाखल केली होती. या गुन्ह्याचा तपास करत असताना शाहराजवळील टोल नाके परिसरातील सीसीटीव्ही तपासले असता त्यामध्ये 2 संशयित व्यक्ती दिसून आले. त्यावरून पोलिसांनी सचिन व उमेश या दोघांना ताब्यात घेवून विचारपूस केली. यावेळी त्या दोघांनी संदीप सरीन यांचा 407 टेम्पो, फुलंब्री येथील शेषराव यांची 20 हजार किमतीची पल्सर, व जवाहरणगर पोलीस ठाण्यात घरफोडी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्या जवळून 4 लाख 20 हजार 70 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करत विविध पोलीस ठाण्यात दाखल असेलेले 3 गुन्हे उघडकीस आणले आहे. ही कारवाईही जिन्सी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दत्ता शेळके, रफी शेख, संपत राठोड, पोलीस हवालदार व्ही एस काकडे यांच्या पथकाने केली आहे.