औरंगाबाद - कोरोनाचा प्रदूर्भाव थांबवण्यासाठी प्रशासन आता कडक पावले उचलणार असून रात्री अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी रात्री नऊ वाजता सर्व दुकान बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी काढले आहेत. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकाचा दुकान परवाना रद्द करून दुकान सील करण्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.
औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात लोकप्रतिनिधींची बैठक पार पडली. या बैठकीत रस्त्यांवर होणारी गर्दी आणि रात्री उशिरापर्यंत सुरू असणारी बाजार पेठ याबाबत चर्चा झाली. त्यामध्ये बाजार पेठा रात्री नऊपर्यंत बंद करण्याचे आदेश असले तरी रात्री उशिरापर्यंत दुकान सुरू असल्याने मोठ्या प्रमाणात रस्त्यावर गर्दी होत असल्याचे लोकप्रतिनिधींनी निदर्शनास आणून दिले. त्यावर आठ दिवसांपूर्वी सूचना देऊनही दुकान रात्री नऊ नंतरही सुरू असल्याने आता कडक अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचा इशारा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिला.मंगळवारी (दि. 22 सप्टें.) रात्रीपासून दोन पथके गस्त घालणार आहेत. नियम मोडणाऱ्या दुकानदाराने दुकान सील करून परवाना रद्द करण्यात येणार आहे. त्यामुळे दुकानदाराने आपली दुकाने रात्री साडेआठ वाजताच बंद करायला सुरुवात करा अन्यथा कारवाईला समोर जा, असा इशारा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिला आहे.
हेही वाचा -व्होटबँक संपत असल्याने काँग्रेसचा शेतकरी कायद्याला विरोध; कायदा फायद्याचा- हरिभाऊ बागडे