औरंगाबाद - जिल्ह्यात लागू करण्यात आलेला लॉकडाऊन शासनाचे पुढील आदेश येईपर्यंत स्थगित करण्यात आला असल्याची माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली. चव्हाण यांनी मंगळवारी उशिरा रात्री (दि.30) पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी ही माहिती दिली.
कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने औरंगाबाद जिल्ह्यात 31 मार्च ते 9 एप्रिल या काळात सक्तीचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. प्रशासनाने जाहीर केलेल्या सक्तीच्या लॉकडाऊनला शहरातील विविध पक्ष, संघटनांनी कडाडून विरोध केला होता. तसेच लॉकडाऊनच्या विरोधात एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी बुधवारी दुपारी 'जनआक्रोश मोर्चा'चे आयोजन केले होते.
सक्तीच्या लॉकडाऊनचा सर्व स्तरातून होत असलेला विरोध पाहता जिल्हा प्रशासनाने, राज्य शासनाचे पुढील आदेश येईपर्यंत लॉकडाऊन स्थगित केला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेस पोलीस आयुक्त डॉक्टर निखील गुप्ता, मनपा आयुक्त आस्तिक कुमार पांडे, ग्रामीण पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील आदींची उपस्थिती होती.