औरंगाबाद (गंगापूर)- तालुक्यातील मालुंजा गावाजवळ शिवना नदीवर खांदेश व पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा जवळचा मार्ग म्हणून ओळख असलेल्या देवगाव ते कायगाव टोका रस्त्यावरील मालूंजा येथील सर्वात मोठ्या शिवना नदीवरील पुलाचे आलेल्या पुराणे दोन्ही बाजूचे कठडे तुटले आहे. जीर्ण झालेल्या पुलामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला असून, पुलाची डागडुजी करून कठडे बसवण्याची मागणी नागरिकांमधून करण्यात येत आहे.
शिवना नदीवरील पूल बनला धोकादायक जीव मुठीत धरून करावा लागतोय प्रवास
लासूर ते गंगापूर दरम्यान असलेल्या शिवना नदीवरील पुल वाहतुकीसाठी धोकादायक बनला असून, शिवना नदीलाआलेल्या महापुरामुळे पुलावरून चार ते पाच फूट उंचीने पाणी वाहत असल्याने आधीच जीर्ण असलेल्या पुलाचे होते नव्हते सर्व संरक्षक कठडे वाहून गेले आहेत. शिवाय पाणी मोजण्याचे टॉवर देखील कोसळल्याने नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे. १०८ मीटर लांबीच्या या पुलाची दयनीय अवस्था झाल्याने, अपघाताचा धोका वाढला आहे. त्यामुळे वाहनधारकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
रस्त्याच्या कामात पुलाची साधी डागडुजीही नाही
कायगाव देवगाव या रस्त्याचे काम करण्यात आले असून वेळोवेळी मागणी करूनही ५७ कोटी रुपयाच्या या रस्त्याच्या कामात पुलाच्या डागडुजीची तरतूद न केल्याने नागरिकांचा साबा विभागाच्या विरोधात रोष वाढला आहे. पुलाखालून पाण्याचा प्रवाह वाहता आहे. रात्रीच्या वेळी कधीही मोठा अपघात होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे या पुलाला संरक्षक कठडे बसवावे अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.